जिल्हाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष-खा.पटेल

0
4

तुमसर : केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे खासदार व आमदार देखील आहेत. दोन वर्ष झाली. परंतु समस्या जैसे थे च आहेत. शेतकर्‍यांच्या धानाला भाव असो, की बेरोजगारी किंवा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न असो. एकही दमडी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाला मिळाली नाही. हे त्रिकालवादी सत्य असून शासनाचे व निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी दुर्लक्ष जिल्ह्याचे दुर्भाग्य असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तुमसर येथील केशवराव पारधी, नारायण तितीरमारे, राजेश ठाकुर, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे, अनिल बावनकर यांच्या घरी सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, आमदार राजू जैन, योगेश सिंगनजुडे, सुरेश रहांगडाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पटेल यांनी यावेळी, मागील दोन वर्षात जिल्ह्यासह कुठेच नवीन कार्य या सरकारने केले नाही. जे जुने कार्य आघाडी शासनाचे आहेत ते देखील सुरळीत चालू शकत नाही. त्याचे ज्वलंत उदाहरण सोंड्याटोला उपसा सिंचनचे देता येईल. दोन वर्षापासून विजेचे ३५ लाख रूपये थकीत असल्याने पाण्याचा उपसा बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. म्हणून आमच्या पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात आले व ३५ लक्ष रुपये बिलातून १५ लक्ष रुपयाचे बिल कमी करण्याचे आश्‍वासन दिले.परंतु उर्वरीत बिलाचे काय? असा प्रश्न उद्भवतो. काही दिवस उपसा सुरु ठेवून परत ती बंद पडेल. थकीत बिल माफ करायचे असेल तर संपूर्णबिल माफ व्हावी अशी आमची भूमिका आहे.
बावनथडीला अजूनपर्यंत एक रूपया मिळाला नसता विद्यमान आमदार, खासदारांनी मोठमोठे होर्डींग लावून १२0 कोटी मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन करवून घेतले. तर खासदारांनी बावनथडीला प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश करून मार्च अखेर बावनथडीला कार्य पूर्ण होणार असा दिंडोरा पिटला, परंतु अजूनपर्यंत कोणतेच कार्य झाले नाही. फक्त घोषणाबाजी व पोकळ आश्‍वासने देवून भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करीत असल्याचेही ते म्हणाले. युनिव्हर्सल फेरो अलाईज कधी सुरु होणार याबाबद पटेल यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही सत्तेत असताना खंबाटा कंपनी सुरु होण्याकरिता भरघोस प्रयत्न केले. मात्र त्यावेळी आम्हाला यश आले नाही. जनतेने आम्हाला नाकारले व दुसर्‍यांवर विश्‍वास ठेवून त्यांना निवडून दिले आहे. त्यांनी तरी कंपनी करून दाखवावी असे मिस्कीलपणे उत्तर दिले. सांगताना म्हणाले की लोकांना वाटेल तेव्हाच लोकसभा लढविन अन्यथा राज्यसभेवर आजन्म खासदार तर राहणार आहेच. परंतु लोकंची सेवा, त्यांचे कार्य करणे मला स्वस्थ बसू देत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.