कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार?

0
10

नागपूर – मुंबईत झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात राज्यपालांना अडथळा आणू पाहणाऱ्या अब्दूल सत्तार, जयकुमार गोरे, वीरेंद्र जगताप, राहुल बोंद्रे, अमर काळे या कॉंग्रेसच्या पाच आमदारांचे केलेले निलंबन रद्द करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची आज विधानसभा आवारात बैठक झाली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या पाच आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी त्या पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत सहानुभूती दर्शवली असली तरी याबाबत ठोस आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या पाच आमदारांचे निलंबन रद्द होणार का, याकडे आमदारांचे डोळे लागले आहेत.