मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज- शरद पवार

0
5

मुंबई, दि. 17 : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बोलण्यापेक्षा कृतीची जास्त गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यकर्त्यांनी केवळ ‘समाजाच्या भावनांशी सहमत आहोत’ असे म्हणून चालणार नाही.  राज्यकर्त्यांनी कृती करायला हवी, असे सांगत पवार यांनी सत्ताधारी भाजपला टोला लगावला. मी राज्यकर्ता नाही. माझ्या हातात काही अधिकार नाहीत. त्यामुळे ज्यांच्या हाती अधिकार आहेत, त्यांनी कृती करायलाच हवी, असे पवार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत राज्यभरात विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. शेती आणि आरक्षणाबाबतची सरकारी अनास्था मराठा समाजाच्या उद्रेकास कारणीभूत आहे. अशावेळी राज्य सरकारने चर्चेत वेळ काढण्यापेक्षा ठोस निर्णय घेतले पाहिजेत. ज्यांच्या हाती सूत्रे आहेत, त्यांच्याकडून काही निर्णयच घेतले जात नाहीत, अशावेळी जनता रस्त्यावर उतरते, असे सांगत पवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. मात्र, सध्याच्या मोर्चांमध्ये संयम आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील लोकांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.
अ‍ॅट्रॉसिटीचा काही प्रमाणात गैरवापर – फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा शिक्षणसम्राटांच्या मक्तेदारीसंदर्भात केलेल्या आरोपांनाही पवार यांनी मुलाखतीदरम्यान प्रत्युत्तर दिले. मराठा नेत्यांनी अनेक खासगी संस्था काढल्या, स्वत:ची संस्थाने उभी केली. मात्र, या शैक्षणिक संस्थांमध्ये किती गरीब आणि मध्यमवर्गीय मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, याची शहानिशा व्हायला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यासाठी खासगी शिक्षणसंस्थांच्या मक्तेदारीवर टाच आणण्याचेही संकेत फडणवीस यांनी दिले होते. मात्र, सरकारने शिक्षण संस्था ताब्यात घेणे हा मूर्खपणा असल्याचे पवारांनी सांगितले. ज्यांनी कष्टाने या संस्था उभ्या केल्या,त्यांना लोकांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी स्वत:च्या खिशातून या संस्था उभ्या केलेल्या नाहीत. त्यांना जनतेचा पाठिंबा होता. यात शिकणार्‍यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अधिक समावेश आहे, असे पवार यांनी म्हटले.