गोंदिया-भंडारा मतदारसंघात रंगणार सामना

0
14

 

आघाडीतील बिघाडीचा भाजपला लाभ

गोंदिया – तब्बल 12 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या विधान परिषदेची जागा यावेळी सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केली असली आघाडीतील बिघाडीशिवाय भाजपला ही जागा आपल्या ताब्यात घेणे वरवर तरी शक्य नाही. अद्याप तरी युती आणि आघाडी यांच्या मतदारांच्या संख्येत बरीच तफावत असल्याने आघाडीत होणाऱ्या दिलजमाईवर या मतदारसंघाचे भविष्य अवलंबून आहे.

येत्या 19 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपंचायती व नगर परिषदांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी सरकारने ही निवडणुक लावल्याने अनेकांचे समिकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे. या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील 195 तर गोंदिया जिल्ह्यातील 200 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या अनुक्रमे 52 व 53 एवढी असून पंचायत समितीचे सभापतींची संख्या 7 व 8 अशी आहे. याशिवाय दोन्ही जिल्ह्यातील नगर परिषदेतील सदस्यसंख्या अनुक्रमे 188 व 192 अशी आहे.

यात पक्षनिहाय मतदारांचा विचार केला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 124, भाजपकडे 114, राष्ट्रीय कॉंग्रेसकडे 102 तर शिवसेनेकडे 24 मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीचे पारडे सध्या तरी जड वाटते. शिवसेनेचा या मतदार संघात फारसा प्रभाव नसल्याने त्यांना मित्रपक्ष म्हणून भाजप जवळचा वाटतो. या उलट कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात कॉंग्रेसच्या काही बड्या नेत्यांनी पक्षापेक्षा स्वतःच्या हिताला जास्त प्राधान्य दिल्याने या दोन्ही पक्षातील आघाडी म्हणजे वाघिणीचे दुधच वाटते. सत्ताधारी भाजपला आघाडीतील बिघाडीशिवाय ही निवडणुक सोपी नाही. कॉंग्रेस पक्षाने आघाडी करीत राष्ट्रवादीला उमेदवारी दिल्यास कॉंग्रेसच्या मतदारांपुढे मोठे धर्मसंकट उभे राहण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर नेत्यांच्या स्वार्थामुळे यापूर्वीसुद्धा जिल्ह्यात दळभद्री युत्या झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले कॉंग्रेसचे सदस्य हे भाजपला मतदान करणार? यावर उमेदवाराच्या विजयाचे समीकरण अवलंबून आहे.

भाजपचा विचार केल्यास ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस एकत्र आल्याने त्यांनी या मतदार संघात नागपूरचे नगरसेवक व व्यावसायिक परिणय फुके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केलेली आहे. कॉंग्रेसतर्फे गोंदियातील प्रफुल्ल अग्रवाल यांचे नाव समोर केले जात आहे, तर राष्ट्रवादीतर्फे तब्बल 12 वर्षे अधिराज्य गाजविणारे आमदार राजेंद्र जैन हेच रिंगणात राहणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आघाडीतील बिघाडीवर भाजपचे लक्ष राहणार आहे.