पहिल्या ‘एव्हरेस्ट’वीर महिलेचे निधन

0
8
टोकियो : जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला  जापानी गिर्यारोहक जुन्को ताबेई यांचे वयाच्या  ७७व्या वर्षी आजाराने निधन झाले.
ताबेई यांनी मे १९७५मध्ये एव्हरेस्ट सर केले होते. तेव्हा त्या ३५ वर्षांच्या होत्या. त्यानंतर १९९२पर्यंत त्यांनी एकापाठोपाठ जगातील सर्वांत उंच ७ शिखरांना गवसणी घातली. त्या जठराच्या कर्करोगाने पीडित होत्या. साईतामा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०११च्या भूकंप आणि त्सुनामीची झळ बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी गेल्या जुलैत माऊंट फुजी हे शिखर सर केले होते. हे त्यांचे अखेरचे गिर्यारोहण ठरले. ताबेई मूळच्या फुकुशिमा परगण्यातील आहेत. २०११च्या आपत्तीत याच परगण्याची अपरिमित हानी झाली होती. माऊंट एव्हरेस्टच्या चढाईदरम्यान हिमस्खलन होऊन त्या बर्फाखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र, एका गाईडने बर्फाखालून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांनी चढाई सुरू ठेवली. त्यानंतर १२ दिवसांनी शिखरावर पोहोचत एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिली महिला होण्याचा मान त्यांनी पटकावला. एव्हरेस्ट सर केल्यानंतर जागतिक स्तरावर त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, माझ्या आधी ३६ लोकांनी एव्हरेस्ट सर केल्याचे सांगून त्या या गोष्टीला महत्त्व देणे टाळायच्या. ७ खंडांतील ७ सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या पहिल्या महिला बनण्याचा मानही त्यांनी मिळविला. त्यांनी ६० हून अधिक देशांत गिर्यारोहण केले. चार वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. तथापि, त्यानंतरही त्यांनी गिर्यारोहणात खंड पडू दिला नाही.