पृथ्वीराजबाबांमुळे अामच्या काळात रखडले शिवस्मारक -सुनील तटकरेंंची टीका

0
7

पुणे (वृत्तसंस्था) दि. 28 – अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र, ते का होऊ शकले नाही याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच देऊ शकतील, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आगामी दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने बुधवारी (ता. २८) पुण्यात एकदिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आजी- माजी आमदार तसेच सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीस उपस्थित राहणार आहेत. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. आमदार हेमंत टकले, प्रवक्ते अंकुश काकडे या वेळी उपस्थित होते.

शिवस्मारक व डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या परवानग्या आमच्या काळातच अंतिम टप्प्यात आल्या होत्या. परंतु, त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत उत्सुकता दाखवली नाही, असा अाराेप करून तटकरे म्हणाले, ‘सत्ताबदल झाल्यानंतर आताच्या सरकारने उर्वरित कार्यवाही पूर्ण केली. हेच काम आम्हीदेखील करू शकलो असतो. मात्र, अपेक्षित मंजुऱ्या का मिळाल्या नाहीत, याचे उत्तर त्या वेळचे मुख्यमंत्रीच देऊ शकतील’, असे सांगून तटकरे यांनी दोन्ही स्मारकांच्या विलंबाचे खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्या डाेक्यावर फाेडले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमचा प्रासंगिक करार होता, असे म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही तटकरे यांनी टीका केली. ‘प्रासंगिक करार हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच ऐकला. यामुळे चांगले मनोरंजन झाले. याची वेगळ्या शब्दात संभावना करता येईल; पण मी ती करणार नाही. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच व्यापक भूमिका घेतली. राजकीय टीकेची सुुरुवातदेखील काँग्रेसकडून पहिल्यांदा झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी आमच्यावर टीका केली. आम्ही पहिल्यांदा टीका केली नाही. प्रचाराच्या काळात उत्तर मात्र जरूर दिले’, असे तटकरे म्हणाले.