विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

0
10

नागपूर दि.०१ मार्च : नागपूर महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नवीन पेच उभा झाला आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार यावरून विविध कयास लावण्यात येत आहेत. गटातटाचे राजकारण बाजूला सारून ताज्या दमाच्या नेत्याला हे पद देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रफुल्ल गुडधे यांचे नाव आघाडीवर असून काही नगरसेवकांचेदेखील त्यांनाच अनुमोदन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दुसरीकडे गुडधे यांच्यासोबतच नगरसेवक संदीप सहारे, संजय महाकाळकर व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांचे नाव शर्यतीत आहे.
महापालिकेत काँग्रेसचे २९ च नगरसेवक पोहोचू शकले. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांचा पराभव झाल्यामुळे आता नव्या नेत्याला संधी मिळणार आहे.निवडणुकांमधील एकूण कामगिरी लक्षात घेता प्रफुल्ल गुडधे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग ३८ मध्ये त्यांच्या बळावर कॉंग्रेसच्या सर्व जागा निवडून आल्या. विशेष म्हणजे त्यांचा पराभव व्हावा यासाठी भाजपाचे मोठे नेतेदेखील कामाला लागले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील जयताळ््यात सभा घेतली होती. एका प्रकारे गुडधे विरुद्ध भाजपाची अशीच लढाई झाली. गुडधे सातत्याने चार वेळा निवडून आले आहेत. त्यांचे सभागृहातील कामदेखील चांगले राहिलेले आहे. आजच्या स्थितीत भाजपाला आव्हान देणारा त्यांच्याव्यतिरिक्त एकही नेता दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.