शिवसेना मंत्र्यांची बोलावली तात्काळ बैठक

0
9

मुंबई, दि.०१ मार्च- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. सर्व मंत्र्यांना तात्काळ उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे. आरोग्य मंत्री दिपक सावंत दाखल झाले आहेत.
शिवसेनेपेक्षा अवघे दोन नगरसेवक कमी असलेली भाजप सत्तेसाठी नगरसेवक फोडू शकते, अशी भीती शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपाकडे बहुमत नाही. पण सर्वाधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी मंगळवारी शिवसेनेने घाईगडबडीत कोकण आयुक्तांकडे पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांसह स्वत:च्या नगरसेवकांची नोंदणी करून त्यांना कायदेशिर बंधनात अडकवले आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांना कायद्याच्या बंधनात अडकून ठेवण्यासाठी मंगळवारी कोकण आयुक्त कार्यालय गाठले. कोकण आयुक्त कार्यालयात मुंबई महापालिका शिवसेना पक्षाची रितसर नोंदणी करून, चार अपक्ष नगरसेवक व शिवसेनेच्या 84 नगरसेवकांची अधिकृत नोंदणी केली. परिणामी 88 नगरसेवक आता कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. या नोंदणीमुळे नगरसेवकाला इच्छा असूनही तो दुसर्‍या पक्षात प्रवेश करू शकत नाही. तसा प्रयत्न केला तर, त्या नगरसेवकाचे पद रद्द होऊ शकते.