महाराष्ट्रावरच अन्याय का? – राधाकृष्ण विखे पाटील

0
14

मुंबई, दि. 4 – महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांची परिस्थिती उत्तर प्रदेशपेक्षा गंभीर असताना भारतीय जनता पक्षाचे सरकार येथील शेतक-यांना कर्जमाफी देत नाही, परंतु उत्तर प्रदेशात कर्जमाफी केली जाते, हा महाराष्ट्रातील शेतक-यांवर अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशातील कर्जमाफीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी भाजपा-शिवसेना सरकारच्या दुटप्पीपणाचा समाचार घेतला. भाजपचे केंद्र सरकार महाराष्ट्राच्या कर्जमाफीसाठी मदत करण्याची ठोस भूमिका घेत नाही. या परिस्थितीत उत्तर प्रदेशातील शेतक-यांना जाहीर झालेली कर्जमाफी म्हणजे महाराष्ट्रातील शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे असून या दुजाभावाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
राज्य सरकारला कर्जमाफी करता येत नाही ही शोकांतिका – धनंजय मुंडे
उत्तरप्रदेश सरकार निवडणुकीच्यावेळी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पहिल्याच बैठकीत पूर्ण करते. मात्र, राज्य सरकारला अडीच वर्षातही पूर्ण करता येत नाही ही शोकांतिका, असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.