काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळला;लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा

0
9
लातूर, दि.21 – काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व. विलासराव देशमुखांच्या लातूर महापालिकेवरील काँग्रेसची गढी  भाजपा लाटेत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड्या करित महापालिकेवर गेल्या ६५ वर्षात पहिल्यांदाच भाजपाने आपला भगवा फडकला. भाजपाने ७० पैकी 41 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. परिवर्तन होऊन कमळ फुलल्याने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हेच जिल्ह्याचे नेते यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेच, शिवाय आ. अमित देशमुखांचे नेतृत्व नाकारुन त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसमोर आव्हान उभे केले आहे.
कधी काळी लातूर आणि काँग्रेस हे समीकरण अतूट होते. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतके हे नाते घट्ट होते. मात्र आधी नगरपरिषदा, मग जिल्हा परिषद आणि आता महापालिका या सर्व निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली. महापालिकेच्या ७० पैकी 41 जागांवर विजय मिळवित भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा मोठा विजय मानला जातो.लातूर महानगरपालिका निकाल 2017

भाजप – 41

काँग्रेस – 28

राष्ट्रवादी – 01

मावळत्या महापालिकेत भाजपाला एकही जागा नव्हती. झिरो जागा असतानाही भाजपाने कमाल केली. शिस्तबध्द प्रचार यंत्रणा, मजबूत कार्यकर्त्यांची फळी आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्टÑीय प्रवक्ते शहानवाज हुसेन आदींच्या प्रचारसभाचा धुरळा यामुळे भाजपाने जोरदार मुसंडी मारित काँग्रेसला चारी मुंड्या चित केले.