तेव्हा राजीनामे देणारे आता कुठे गेले-खासदार पटेल

0
12

भंडारा,दि.30 : शेतकरी संकटात असल्याचे सांगून स्वत:ला भूमिपूत्र समजणारे तेव्हा राजीनामे दिले होते. आता शेतकरी संकटात असताना राजीनामे देण्याची गरज आहे. परंतु राजीनामे देणारे आता कुठे गेले? असा प्रश्न करून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरूद्ध येत्या १७ मे रोजी भंडारा जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे उपस्थित होते.

स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या तीन वर्षात जिल्ह्यात कुठलाही विकास शोधून सापडत नाही. शेतात उत्पादित पिकाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, पेट्रोल व ङिझेलचे वाढते दर, गॅसची दरवाढ या विषयांसह शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरकारच्या धोरणांविरूद्ध राष्ट्रवादी काँगे्रेसने साकोली, लाखनी, लाखांदूर, मोहाडी, पवनी व तुमसर तालुक्यात मोर्चा काढला.

यावेळी ते म्हणाले, यापूर्वी देशात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना शेतमालाला योग्य तो भाव देण्यात आला होता. देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर शेतकऱ्यांना समर्थन मूल्य वाढवून दिले जाईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. परंतु मागील तीन वर्षांत एकही आश्वासने पूर्ण झालेली नाही.भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या आहे. ‘भेल’ प्रकल्पाचे काम रखडले आहे. महिला रूग्णालय मंजूर होऊनही अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही.