हिंमत असल्यास शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे : सुप्रिया सुळे

0
9

परभणी,दि.24 : कर्जमाफीच्या मुद्यावर दोन दगडावर पाय ठेवून सुखसोयींसाठी मंत्रिपद भोगणाऱ्या शिवसेनेने हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले आहे. सध्याच्या सरकारचे कान बंद असून झोपेचे सोंग घेणारे हे सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहणार आहेत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यशस्विनी अभियान व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण यांच्या वतीने बुधवारी (दि. 24) येथील राष्ट्रवादी भवनात खासदार सुळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 25 विधवा महिलांना रोजगार साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, “राज्यात शेतकरी संकटात आहे, आत्महत्यांचे आकडे वाढत चालले असताना हे सरकार झोपेचे सोंग घेत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. जुमले पे जुमला असे हे सरकार असून कान बंद करुन केवळ बोलघेवडेपणा सुरू केला आहे.”शेतमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे असे या सरकारचे ध्येय असल्याची, टीका सुळे यांनी केली. एवढ्या आत्महत्या होत असताना सरकारला त्याचे काहीच वाटत नसल्याने अजून किती शेतकऱ्यांचे बळी घेणार असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. आत्महत्यांबाबत सरकारवर खुनाचा गुन्हा का नोंदवू नये अशीही विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.