मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना तयार-पर्यावरण मंत्री कदम

0
11

नांदेड,दि.09- मी कर्जमुक्त होणारच हे अभियान शिवसेनेकडून राबविले जात आहे. शिवसंपर्क अभियान हे पक्षाचे अभियान होते. या अभियानाची माहिती घेण्यासाठी मराठवाडा, विदर्भ व खानदेशाच्या काही भागाचा दौरा 18 तारखेपर्यंत करण्यात येणार आहे. शिवसेना सत्तेसाठी सत्तेत नसून केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही सत्तेत आहोत, यामुळेच मी कर्जमुक्त होणार हे अभियान शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी राबविले जात आहे. मध्यवर्ती निवडणुकीसाठी शिवसेना कधीही तयार आहे, आम्ही कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काम करत नाही असे मत राज्याचे पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांनी नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

नांदेड येथील मिनी सह्याद्री येथे पत्रकारांशी बोलत असता ना. कदम म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविले होते. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाची माहिती घेण्यासाठी माझ्याकडे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश यातील काही भागाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. यामुळे मी 18 तारखेपर्यंत दौऱ्यावर आहे. आज नांदेडच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांकडून अभियानाची माहिती जाणुन घेत आहे. याचबरोबर मी कर्जमुक्त होणार हे अभियान शेतकऱ्यांसाठी राबवत आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्तेत आहोत शेतकऱ्यांसोबत आम्ही असून आम्हाला सत्तेची लालसा नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा हंगाम सुरू होण्याअगोदर कर्जमुक्त करण्याचे लेखी आश्वासन आम्हाला त्यांनी दिले होते. पण आता 31 ऑक्टोबर ही तारीख दिल्याने मंत्रीमंडळाच्या बैठकीतून आमचे मंत्री बाहेर पडले व बैठकीवर बहिष्कार टाकला, या बैठकीला मी नव्हतो असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेची फसवणुक न करता ते शेतकऱ्यांची फसवणुक करत आहेत.

काही जण दिल्लीत जाऊन पंतप्रधानाच्या भेटी घेतात आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगतात आणि राज्यात येऊन शेतकऱ्यांना म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहोत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने साडे तीन लाख हजार कोटीचे कर्ज करून ठेवले आहे ऐवढेच नसून 70-70 हजार कोटी रूपयांचा सिंचनात भ्रष्टाचार केला. जे काही शेतकरी सध्या आत्महत्या करीत आहेत ते पाप कॉंंग्रेस-राष्ट्रवादीचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी आंदोलन करण्याचा काही नैतिक अधिकार नाही पण राष्ट्रवादी कॉंगे्रस हे केवळ शिवसेनेला डवचविण्याचे काम करत आहे. कारण सत्तेतून ते कधी बाहेर पडतील आणि आम्ही कधी आत घुसो यामुळे आमच्या फाईली व चौकशा कधी बंद होतील याची वाट ते पाहत आहेत पण राजीनामा देण्याचा सल्ला साडे तीन लाख हजार कोटींचे कर्ज राज्यावर करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला शिकवू नये, जेव्हा आम्हाला राजीनामा द्यायचा आहे तेव्हा निश्चित देऊ पण शेतकऱ्यांचे पाप डोक्यावर घेणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आम्हाला सल्ला देण्याची गरज नसल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. यावेळी आ. हेमंत पाटील, आ. सुभाष साबणे, आ. नागेश पा. आष्टीकर, जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुख, नगरसेवक बिल्लू यादव, तुलजेश यादव यांची उपस्थिती होती