मध्यावधीसाठी भाजप तयार-अमित शहा

0
7
मुंबई, दि. 17- राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यासाठी भाजप तयार असल्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मध्यावधी निवडणुका झाल्याच तर, आम्हाला लढावेच लागेल. मैदान सोडून तर जाता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट  केले आहे. निवडणुका झाल्या तर भाजप लढेल आणि जिंकेलही, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांना भाजप तयार असल्याचे संकेत दिले होते.
 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. यातच सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा अनेकदा शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसंच मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे, असे म्हटले होते. यावरच अमित शहा यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी  निवडणुका झाल्याच तर भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दलही वक्तव्य केले आहे. उमेदवाराच्या नावावर सहमतीसाठी विरोधी पक्षांची चर्चा सुरू आहे. तसेच इतर पक्षांकडून सूचना मागविण्यात आल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्यावर विचार केला जाइल, असे उत्तर अमित शहा यांनी दिले आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी भाजपाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. मोदी सरकारनं तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा आणि गती दिली. सरकारवर आतापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असंही त्यांनी सांगितले.