हॉकीपटूंचा जयजयकार करण्यासाठी का नाही उतरले रस्त्यावर ? – उद्धव ठाकरे

0
12

  मुंबई, दि. 20 – पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना हरलो म्हणून आमच्याकडील तथाकथित देशभक्तांनी आपल्या क्रिकेटपटूंचा निषेध केला. त्यांचे पुतळे जाळले. रागाने घरातील टीव्ही रस्त्यावर आणून फोडले. क्रिकेटपटूंच्या नावाने शिमगा केला. हा सर्वच प्रकार आता हास्यास्पद ठरत आहे. मग हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा धिक्कार करणारे हे देशभक्त पाकड्यांच्या हॉकी संघाला पराभूत करणाऱ्या हिंदुस्थानी हॉकीपटूंचा जयजयकार करण्यासाठी रस्त्यावर का उतरले नाहीत? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर काहीजणांनी आपले टीव्ही फोडले. पण त्याचदिवशी भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर 7-1 असा दणदणीत विजय मिळवला होता. क्रिकेटसाठी देशप्रेमाची भावना व्यक्त करताय मग तशीच भावना हॉकीसाठी का नाही दाखवत? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारलाय. भारतीय संघाने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला नकार दिला असता तर, राष्ट्रभावना अधिक प्रखर झाली असती असे अग्रलेखात म्हटले आहे.
 एकाही क्रिकेटपटूने पाकविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही. राष्ट्रासाठी त्याग केला नाही. बंडाचे निशाण फडकविले नाही व इकडे देशभक्त मंडळी मात्र रस्त्यावर टीव्ही फोडण्याचा पराक्रम गाजवत बसली. खरे म्हणजे खेळामध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकेल. त्यात चुकीचे ते काय? पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा देशांबरोबर आपण क्रिकेट खेळतो व हरतो तेव्हा हे असे टीव्ही वगैरे फोडण्याचे प्रकार घडत नाहीत. पाकिस्तानच्याच बाबतीत ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. कारण शेजारचे राष्ट्र हे दुश्मन राष्ट्र असल्याचे हिंदुस्थानातील सवाशे कोटी लोकांनी मान्य केले आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.