खान्देशात मनसेचा झेंडा, ललित कोल्हे जळगावच्या महापौरपदी

0
7

जळगाव,दि.07 : मुंबई, ठाणे, पुणे किंवा अगदी नाशिकपुरतीच राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मर्यादित असल्याची टीका होत असताना, सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावात घडली आहे. जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विराजमान झाले आहेत.जळगाव महापालिकेत खान्देश विकास आघाडीचे नितीन लद्धा महापौर होते. त्यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची जळगाव महापालिकेचे 11 वे महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 12 नगरसेवक सोबत असताना त्यांनी महापौरपदापर्यंत मजल मारली.

जळगाव महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. साधारणपणे प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून रोटेशन पद्धतीने महापौरपद पाच वर्षे विभागून देण्यात येत असते. याच प्रथेनुसार पक्ष श्रेष्ठींच्या सांगण्यावरुन नुकताच नितीन लद्धा यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर खान्देश विकास आघाडीच्या नव्हे, तर मनसेच्या ललित कोल्हे यांची वर्णी लागली आहे.मनसेच्या ललित कोल्हेंना मिळालेली संधी, ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे ललित कोल्हे हे बिनविरोध निवडून जाण्यासही यशस्वी ठरले आहेत.