पुढच्या वर्षीपासून पशु व मत्स्यविभागातही आॅनलाईन बदल्या-ना.जानकर

0
22

नागपूर,दि.07 : विभागात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. जे काम करणार नाहीत त्यांची बदली करायला क्षणाचाही विलंब केला जाणार नाही. माझ्या वहिनीची परळी येथे बदली झाली. आईने फोन करून बदली थांबविण्यासाठी मदत करता येईल का, असे विचारले. मी स्पष्ट नकार दिला, असे घरातील उदाहरण सांगत प्रशासकीय बदल्यांमध्ये मी कुणाचीही शिफारस ऐकणार नाही, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी आॅनलाईन बदलीचे धोरण राबविले जाईल व पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कुणालाही एका ठिकाणी राहता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण तसेच कुलगुरू निवास व मत्स्य महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.ए.के. मिश्रा होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, कुलसचिव डी.बी. राऊत, कार्यकारी परिषदेचे डॉ. सटाले, अभियंता व्ही.सी. वैद्य, खळतकर कंस्ट्रक्शन कंपनीचे खळतकर, कंत्राटदार जितेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
या वेळी जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाला शक्य तेवढी मदत करीत आहेत. त्यामुळे आता या विभागात काम करणारे संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाºयांनी मनापासून काम करून आपल्या ज्ञानाचा फायदा शेतकºयांना करून देण्याची गरज आहे. सर्वच अधिकारी व कर्मचाºयांना नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या शहरातच नियुक्ती हवी असते. मात्र, तसे होणार नाही. राज्यातील प्रत्येक भागात शेतकºयाला गरज असेल तेथे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी खा. महात्मे यांनी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात होत असलेला बदल लक्षणीय असल्याचे सांगून मुलीही मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या राजे यशवंतराव होळकर मेषपालन, कुक्कुट पालन योजनेचा महिलांनी लाभ घेतल्यास निश्चितच आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापौर नंदा जिचकार यांनी महिलांच्या सर्वच क्षेत्रातील सहभागाबाबत समाधान व्यक्त करून पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मुलींना अत्याधुनिक वसतिगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.
मत्स्यव्यवसाय मंत्रालयातर्फे केंद्र सरकारच्या सहकार्यातून ससून येथे जगातील पहिल्या क्रमाकांचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर नागपुरातही पशु विद्यापीठाच्या जागेवर मत्स्यालय उभारण्याची आपली तयारी आहे. विद्यापीठाने तसा प्रस्ताव सादर केला तर त्याला त्वरित मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा यावेळी जानकर यांनी केली. सोबतच येथे शेतकºयांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.