महागाईच्या विरोधात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
6

अमरावती ,दि.18 -सध्या इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत प्रचंड दरवाढ होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. राज्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७९.४१ रुपये तर डिझेलचा प्रतिलिटर ६२.२६ रुपये इतका झाल्याने याचा परिणाम महागाईवर झाला असून केंद्र व राज्य शासनाचा कडाडून निषेध करण्यासाठी अमरावती जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.
१ जुलै २0१७ रोजी पेट्रोलचा दर ६३ रुपये लिटर तर डिझेलचा दर ५८ रुपये इतका होता. तर १0 सप्टेंबर २0१७ रोजी पेट्रोलमध्ये १६ रुपयांची तर डिझेलमध्ये ४ रुपयांची दरवाढ आहे. ही नागरिकांची चक्कफसवणूक आहे. महाराष्ट्रातील या पेट्रोल डिझेल दरवाढीचा सर्व भुर्दंड सरकार नागरिकांवर लादत आहे. महाराष्ट्र इंधनावर विविध प्रकारचे सेस लावत आहेत. अन्नधान्य, दुधापासून सर्वच जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढलेल्या आहेत. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. तसेच या दरवाढीचा थेट परिणाम उद्योग व्यवसायावरही होत असून माल वाहतूक महागली आहे. अगोदरच महागाईने होरपळून निघालेल्या जनतेवर सरकारने लादलेली ही पेट्रोल-डिझेल दरवाढ अन्याय आहे. जीवनावश्यक गॅस सिलेंडरची दरवाढ रोखण्यात यावी, भारनियमन बंद करण्यात यावे, शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली असता, त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, खाजगी व्यापार्‍यांमार्फत मुंग आणि उडीद पिकाच्या खरेदीत शेतकर्‍यांचे ऑफलाईन अर्ज घ्यावेत अशा आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. शासनाने केलेली दरवाढ आणि करवाढ तातडीने मागे घ्यावी असी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, नगरपालिकांचे नगरसेवक, कॉंग्रेस मित्र पक्षाचे कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होती.