फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. – आठवले

0
28

…तर भीमसैनिक  चोख उत्तर देतील – आठवलेंचा राज ठाकरेंना इशारा
# शिवसेनेने भाजपा सोबत वाद करू नये – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई,(शाहरुख मुलाणी),दि.22 – शिवसेनेने भाजपा सोबत वाद करू नये असा सल्ला रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना दिला. तर गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती देशाच्या दुष्मनांशी लढावे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा आठवले यांनी शनिवारला मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंना दिला.
मिरारोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइंचे मिरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर, रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बरशिंग, मुंबई अध्यक्ष  गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, नगरसेविका रुपाली शिंदे, मदन मनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दलची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नये. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे. सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात. सरकारने ही फेरीवाल्यांबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे. दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पात्र ठरवाव्यात या मागणीप्रमाणेच सन 2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्ला रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी रिपाइं भाजपा सोबत राहील असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.