मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौ-यात शिवसेना आमदार आणि मंत्री संजय राठोड यांना वगळले

0
5

यवतमाळ,दि.22 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. राठोड यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ना.राठोड म्हणाले, मी चार टर्म  आमदार आहे. सध्या मंत्री आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोनच मंत्री असताना शिवसेनेला या दौ-यापासून दूर ठेवण्यामागील भाजपाची भूमिका अनाकलनीय आहे. भाजपाला आंदोलकांची एवढी भीती वाटण्याचे कारण काय, हेच समजत नाही. मुख्यमंत्र्यांची खासगी भेट असेल तर समजू शकतो. मात्र, या सार्वजनिक भेटीत आमदार, खासदार व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे, त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहे, हे समजून घेणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले.

एकीकडे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर भोजनासाठी सहपरिवार आमंत्रित करतात आणि दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौºयातून वगळतात, हे राजकीयदृष्ट्या योग्य नाही. मला मुख्यमंत्र्यांच्या दौºयापासून अनभिज्ञ ठेवण्यामागे नेमका राजकीय डाव आहे की प्रशासकीय, याचा शोध घेणे गरजेचे आहे. शिवसेनेला मिळणा-या या दुय्यम वागणुकीचा मुद्दा आपण वरपर्यंत लावून धरणार असल्याचे राठोड म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या दौ-याबाबत प्रशासन किंवा भाजपाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजल्याने आपण चौकशी केली असता, मुख्यमंत्री आज यवतमाळात असल्याचे समजले, असेही राठोड यांनी स्पष्ट केले. हा दौरा गोपनीय ठेवण्यामागे मुख्यमंत्र्यांना आणि विशेषत: भाजपाला शिवसैनिकांची भीती वाटत असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.