खासदार पटोलेंची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर तब्बल दोन तास चर्चा

0
12

मुंबई/गोंदिया,दि.27- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्वपक्षीय नेत्यांना लक्ष्य करूनही पक्षाने कुठलीही दखल घेतली नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे गोंदिया-भंडाराचे खासदार नाना पटोले आता भाजप सोडण्याची राजकीय पार्श्वभूमी तयार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पटोले यांनी आज (शुक्रवार) मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पटोले यांनी उद्धव यांच्यासोबत दोन तास चर्चा केली.या चर्चेदरम्यान विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा पटोले यांनी केला अाहे. येत्या 10 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंसोबत पटोेले यवतमाळचा दौरा करणार आहेत.
दरम्यान, त्यामागे राजकीय कारण असल्याचा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड भाजपला अडचणीत आणून पक्ष सोडण्याची पार्श्वभूमी खासदार पटाेले तयार करत असल्याचा निष्कर्ष राजकीय वर्तुळात काढला जात अाहे. अलीकडेच पटोले त्यांनी भाजपचे नाराज नेते यशवंत सिन्हा यांचीही भेट घेतली होती. तसेच पुण्यात शेतकऱ्यांचे संमेलन आयोजित करून त्यात बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना आमंत्रित करण्याचे त्यांचा प्रयत्न आहे. दरम्यान, अापण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचे पटाेले यांनी म्हटले आहे.

भंडारा येथील खासदार आणि भाजपचे पदाधिकारी असलेले नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदी सरकारवर टीकेचे प्रहार केले आहेत. यवतमाळमध्ये झालेल्या फवारणी मृत्यूनंतर तर त्यांनी थेट आघाडीच उघडली. फवारणीचे मृत्यू गेल्या काही वर्षांपासून घडत होते, प्रशासकीय यंत्रणा ते पुढे येऊ देत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मृत्यू हे सरकारीने घडविलेले हत्याकांडच आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी केंद्र सरकारने संसदीय समिती पाठवावी असे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लिहिले आहे.त्याला प्रतिसाद न मिळाल्याने पटोले इतर पक्षाच्या लोकांची मदत घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते राहुल गांधी यांना भेटून, त्यांच्या खासदारांनी संसदेत शेतकऱ्यांचा विषय मांडावा अशी विनंती करणार आहेत.

गोंदिया/भंडारा जिल्ह्यात मात्र त्यांच्या भूमिकेवर भाजप पुर्णपणे सावध असून त्यांच्या या प्रत्येकवेळीच्या अशा गोष्टीमुळे नागरित साथ देतील अशी आशा करु नये अशी भूमिका दिसून येत आहे.नागरिकामध्ये सुध्दा पटोलेंनी काम केली नाहीत आता शेतकरी शेतकरी करुन विकास कामाचा विषय लपविण्याचा भाग असल्याची चर्चा आहे.असे असले तरी पटोले यांची पुढील राजकीय चाल येत्या काही काळात जेव्हा स्पष्ट होईल तेव्हाच खरे निकाल मिळणार आहे.