सरकारविरुद्ध काँग्रेसची जनआक्रोश रॅली

0
10
नागपूर – केंद्र व राज्य सरकारांविरुद्ध जनतेत प्रचंड असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यभर जनआक्रोश रॅली काढण्यात येत आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ३१ ऑक्टोबरला स्मृतिदिन आहे. याच दिवशी राज्यातील फडणवीस सरकारची सत्तेतील तीन वर्षे पूर्ण होत आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची वर्षपूर्ती आहे. हा योग साधत प्रदेश काँग्रेसतर्फे ३१ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश रॅलीचा शुभारंभ करणार आहे.पत्रपरिषदेला विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार एस. क्यु. जमा, प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर, महिला जिल्हाध्यक्षा तक्षशीला वाघधरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर विभागनिहाय रॅली काढण्यात येईल. ८ नोव्हेंबरला सांगली येथे रॅलीचा समारोप होईल. तर, हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी लाखोंची शेतकरी दिंडीही काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
देशात व राज्यात असलेले सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, जनआक्रोश मांडण्यासाठीच जबाबदार विरोधी पक्ष म्हणून रॅली काढण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ४ नोव्हेंबरला कोंकण विभागातील महाड, ५ नोव्हेंबरला मराठवाड्यातील उस्मानाबाद, ६ नोव्हेंबरला पूर्व विदर्भातील चंद्रपूर, ७ नोव्हेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती व ८ नोव्हेंबरला सांगली येथे समारोप होईल. त्यानंतरचा आक्रोश सातत्याने मांडण्यासाठीचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण जाहीर करणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात ११ ते १३ डिसेंबरपैकी कुठल्याही एका दिवशी लाखोंची उपस्थिती असणारी शेतकरी दिंडी विधिमंडळावर धडकणार आहे. औरंगाबाद ते नागपूर अशी ही दिंडी प्रवास करेल.कापसाला ७ हजार रुपये, सोयाबीनला ५ हजार रुपये भाव देण्याची मागणी करीत यंदा झालेले कमी उत्पादन बघता नुकसानभरपाई देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली आहे. मध्यप्रदेशच्या धरतीवर राज्यातही कृषी मूल्य आयोगाने १ हजार कोटींचा निधी दीर्घकालीन उपाययोजनेसाठी राखून ठेवावा, अशी सूचना त्यांनी केली.
अडीच रुपये प्रति युनिटने मिळणारी वीज आज ५.६० रुपये प्रति युनिटने मिळत आहे. कोळसा खाणी बंद केल्या. ठराविक लोकांच्या फायद्यासाठीच बाहेरून कोळसा आणण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करून कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. शेतकऱ्ऱ्यांची कर्जमाफी ही फसवी असून, भरून घेण्यात येणारे अर्ज चुकीचे असल्याचे व त्यात तांत्रिक चुका असल्याचे सरकारचाच विभाग सांगत असल्याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.