2019 मध्ये शरद पवार पंतप्रधान होण्याबाबत आम्ही आशावादी-प्रफुल पटेल

0
22

कर्जत (रायगड) ,दि.६ : सध्याची राजकीय स्थिती पाहता 2019 पर्यंत राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. या परिस्थितीत आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात याबाबत आम्ही अजूनही प्रचंड आशावादी आहोत, असे वक्तव्य माजी केंद्रीयमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात  बोलत होते. यावेळी त्यांनी  ‘1999 मध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी होण्याची ऑफर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिली होती.’ असा दावा आपल्या भाषणात केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

‘शरद पवारांना एनडीएमध्ये जाण्याची ऑफर होती. पण तत्वांशी तडजोड न करता पवार साहेबांनी त्यांना नकार दिला. जर त्यावेळी ऑफर स्वीकारली असती तर शरद पवार यांना NDA सरकारमध्ये क्रमांक दोनच पद मिळाले असते.’ असंही ते यावेळी म्हणाले.गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळीक असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप यांचा राजकीय विचार वेगळा आहे हे पटवण्यासाठी 1999च्या ऑफरच उल्लेख प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात केला. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील चिंतन बैठकीत बोलत होते.दरम्यान, याच भाषणात पटेलांनी शरद पवार 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्यही केले.‘2019 राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्यात आमच्या मनात पवार साहेबांच्याबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही. ते घडू शकते.’ असेही यावेळी पटेल म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी देखील काही सल्ले दिले. ‘पवार साहेब तुम्ही सॉफ्ट राहणे सोडून द्या. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल पवार साहेब तुम्ही खूप सॉफ्ट राहता.’ असे म्हणत पटेल यांनी पवारांनी आक्रमक भूमिका घ्यावी असेही सुचवले.‘देशाच्या राजकारणात जे वातावरण तयार झालेले आहे ते पाहता आपल्याला खुल्या मनाने काम करावे लागेल. काँग्रेसबरोबर आपले शत्रुत्व नाही सध्या हे संबंध ‘कभी खुशी, कभी गम’ आहेत. 2014 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढली असती तर 125 ते 140 जागांवर विजय मिळाला असता. विधान सभा-लोकसभा निवडणूक एकत्र येऊ शकतात,पक्षाचा ठोस कार्यक्रम ठरला पाहिजे आणि त्यावर काम केले पाहिजे, असे शरद पवार यांना वाटते.’ असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी 2019च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.