नोटाबंदीमुळे कृषी, असंघटीत क्षेत्राची वाताहत झाली – धनंजय मुंडे

0
24

मुंबई (शाहरुख मुलाणी),दि.07 – देश स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या असंख्य निर्णयात नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात अयशस्वी असून, त्याचे चटके वर्षभरानंतरही भारतीयांना सोसावी लागत असल्याची प्रतिक्रीया विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
8 नोव्हेंबर म्हणजे उद्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पुर्ण होत आहे, त्यानिमित्त प्रतिक्रीया व्यक्त करताना धनंजय मुंडे म्हणाले की, नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना जी उद्दीष्टे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितली त्या पैकी एकही उद्दीष्ट सफल झाले नाही. नोटाबंदीचा एकही चांगला परिणाम दिसून आला नाही. उलट असंख्य दुष्परिणाम मात्र भारतीयांना भोगावी लागत आहेत. या वर्षभरात नोटाबंदीमुळे बेरोजगारीचे संकट आले असंघटीत व कृषी क्षेत्राची अपरिमित हानी  झाली. विकासदारातील घट आणि उद्योगांना याचा प्रचंड मोठा फटका बसला याचे चटके या पुढील काळातही किती दिवस सोसावे लागतील हे सांगता येत नाही. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून सत्ताधारी पक्षाला अल्पकालीन राजकीय फायदा झाला असला तरी 125 कोटी जनतेला मात्र याचे चटकेच बसल्याचे मुंडे म्हणाले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कृषी क्षेत्रावर आणि राज्य अर्थकारणावर झालेल्या चांगल्या वाईट परिणामांची श्वेतपत्रिका काढण्याची हिम्मत सरकारने दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.