आ.होळींच्या दत्तक ग्राममध्ये गावकऱ्यांनी टाकले कुटुंबाला वाळीत

0
7

गडचिरोली,दि.07 -जिल्ह्यातील आमदार डाॅ.देवराव होळी यांच्या आमदार दत्तक ग्राम असलेल्या पेंढरी येथे  जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून जेंगठे कुटुंबाला ग्रामस्थांनी  छळ करीत बहिष्कृत केल्याने अखेर त्यांनी आपले गाव सोडून गडचिरोलीचा  आश्रय घेतला आहे.या भयभीत कुटुंबाला पोलिसांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.भाड्याने राहात असलेल्या ठिकाणी जाऊन काही लोकांनी त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण केला. त्यामुळे घरमालकाने खोली खाली करण्याचे फर्मान सोडल्याने जेंगठे कुटुंब हताश असून त्यांनी आता दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेतला आहे. गाव सोडले असले तरी आमच्या मनातील भीती दूर झाली नाही. पोलिस प्रशासनाने सहकार्य करून न्याय मिळून द्यावा, अशी मागणी बहिष्कृत जेंगठे कुटुंबीयांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

धानोरा तालुक्‍यातील पेंढरी गावात अविनाश जेंगठे व त्यांची पत्नी आशा तीन मुलांसह अनेक वर्षांपासून राहत होते. दोन एकर धानाची शेती व त्याला जोडधंदा म्हणून छोटेमोठे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.मोठी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून दुसरी बारावीला आहे.लहान मुलगा नवव्या वर्गात शिकत आहे. अशातच गेल्यावर्षी त्यांच्या कुटुंबावर नको तो प्रसंग ओढवला. हे प्रकरण  पोलिसांत गेल्यानंतर गावातील काही लोकांनी त्यांना लक्ष्य केले. गावात दोन-चार लोकांचा मृत्यू जादूटोणा केल्याने झाला असून अविनाश जेंगठेच हाच त्याचा सूत्रधार आहे, अशी शंका व्यक्त करून जेंगठे कुटुंबीयांना जाणूनबुजून शिवीगाळ करणे, खोटे आरोप लावून पोलिसांत तक्रारी करणे, एवढेच नाही तर जेंगठे कुटुंबाशी बोलण्यावरही गावकऱ्यांनी बंदी घातली.