शिवसेनेच्या पाठिंब्याची भाजपला गरज नाही-माधव भंडारी

0
6

नागपूर,दि.08ः- राज्यात भाजपचे सरकार स्वत:बळावर सत्तेत आहे. आमची कुणालाही साथ नको असेल तर, त्यांनी खुशाल सत्तेतून बाहेर पडावे. सरकारचे काहीच वाकडे होणार नसून, आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही, असा हल्लाबोल भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज एका पत्रपरिषदेत केला. भाजपाचे भंडार्‍याचे खासदार नाना पटोले हे सरकार आंधळे आणि बहिरे असल्याचे सांगत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका करतात, यावर भंडारींना छेडले असता ते म्हणाले, पटोलेंनी आपली भूमिका पक्षाच्या व्यासपिठावर मांडावी. त्यांच्या विधानांसंदर्भात पक्षाचे संसंदीय मंडळ निर्णय घेईल. पक्षाने त्यांना सन्मान दिला. मात्र काही लोक ‘आदत से मजबूर’ असतात, असा खोचक टोला हाणला.
शिवसेनाप्रमुख हयात असतांना अनेक मोठे नेते व लोक त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात असत. परंतु, हल्ली उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींना भेटण्यासाठी हॉटेलवर आणि शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात. तसेच गुजरातला जाऊन हार्दिक पटेलची भेट घेण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यामुळे शिवसेनेचे राजकारण नेमके कुठे चालले आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा टोल भंडारी यांनी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारच्या कारभाराला तीन वर्षे पूर्ण झाली असून, या काळात सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते राज्यभरात पत्रकारपरिषदा घेत आहेत. आज भंडारी यांनी पत्रकारांशी साधला. राज्य शासनाने धडाकेबाज निर्णय घेतल्याचे सांगत भंडारी म्हणाले, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, कृषी क्षेत्रात प्रगती आणि औद्योगिक व सेवा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकारने केले. महामार्गांमध्ये ४0 हजार कोटींची गुंतवणूक, कोकण किनारपट्टीवर ६४ बंदरे उभारली जात असून मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहेत. कृषी विकासाचा दर आधी उणे ११. २ टक्के होता. आता तो १२. ५0 टक्यावर नेण्यात आला आहे. देशातील विदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक (१ लाख २९ हजार ३४0 कोटी) राज्यात आली. कृषी क्षेत्रात ७३ हजार ४४0 कोटींची गुंतवुणूक करण्यात आली. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात असून १३0 आठवडी बाजारपेठा निर्माण केल्या. लघू व मध्यम उद्योगांना चालना दिली जात आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून कृषी मालाला सरकार योग्य भाव देत असून सोयाबिनला २00 रुपये बोनस देऊ केला असल्याचेही ते म्हणाले. पत्रपरिषदेत आ. गिरीश व्यास, किशोर पलांदूरकर, भोजदार डुंबे, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.