पवार-आझाद करणार नागपूर विधिमंडळावरील मोर्चाचे संयुक्त नेतृत्व

0
7

नागपूर,दि.१ : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मोर्चाला संयुक्त नेतृत्व राहणार आहे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
अधिवेशनावर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबरला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ११  डिसेंबरला  वेगवेगळे मोर्चे काढले जाणार होते. परंतु चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून १२ डिसेंबरला संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र १२ तारखेलाच शरद पवार यांचा वाढदिवस आहे व पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याने मोर्चात पवारांच्या छायेखाली काँग्रेस दबल्या जाईल, या भितीने काँगे्रसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती. पवारांच्या नेतृत्वावर काहींनी नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पवार व आझाद हे मोर्चाचे संयुक्त नेतृत्व करणार असल्याचे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिल्याने काँग्रेसजणांना दिलासा मिळाला आहे. मोर्चासाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. परंतु गुजरात निवडणुकीमुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मोर्चाच्या तयारीसाठी चव्हाण यांनी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची मंगल कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. विजय वडेट्टीवार, सुनील केदार,माजी खासदार मारोतराव कोवासे, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आ. एस.क्यू. जमा,सुभाष धोटे, अविनाश वारजूरकर, डॉ.बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अ‍ॅड.अभिजित वंजारी, रवींद्र दरेकर, नाना गावंडे, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, बंडू धोत्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.