मुख्यमंत्र्यांची एकनाथ खडसेंकडे ‘डोळेझाक’

0
11

मुंबई -आपल्या खात्यात मनासारखे अधिकारी मिळत नसल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली असताना बुधवारी राज्यपालांच्या उपस्थितीत एकाच व्यासपीठावर असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील संवाद तर सोडाच, त्यांनी एकमेकांकडे पाहिलेही नाही.

सह्याद्री अतिथिगृह येथे स्वच्छ भारत अभियानावर आधारीत माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ खडसेही उपस्थित होते. मुख्यमंत्री व खडसेंच्या मध्ये राज्यपाल बसले होते. तत्पूर्वी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमासाठी राज्यपाल उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी फडणवीस व खडसे सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. जवळपास दहा मिनिटे शेजारी उभे राहूनही या दोघांनी एकमेकांशी बोलण्याचे टाळले. कार्यक्रमानंतर प्रसिद्धीमाध्यमांनी खडसे यांची प्रतिक्रिया विचारली असता, तुम्हाला जे काय लिहायचे आहे ते लिहा, असे बोलून ते तेथून निघून गेले.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे जवळपास डझनभर खाती असून या खात्यांचे सचिव बदलताना वा तिथे नव्याने नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा आक्षेप खडसेंच्या निकटवर्तियांकडून होत आहे. एकीकडे हवे ते अधिकारी दिले जात नसताना दुसरीकडे ज्यांची नियुक्ती स्वीय सहायक आणि खासगी सचिव म्हणून झाली आहे, त्यालाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून विरोध आहे. साहजिकच खडसे यांची मुख्यमंत्र्यांवर खप्पामर्जी झाली असून त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही अशी चर्चा मंगळवारी दिवसभर मंत्रालयात रंगली होती.