वाढते असहिष्णूतेचे वातावरण मागच्या दाराने येवू घातलेली आणीबाणी नाही का ? – अजित पवार

0
9

मुंबई/रायगड. ( शाहरुख मुलाणी ) – राज्यात आज असहिष्णूतेचे वातावरण वाढले असून ही मागच्या दाराने येवू घातलेली आणीबाणी नाही का ? असा सवाल करतानाच नुसत्या आश्वासनाच्या जाहिरीती फक्त सरकार करत असून सरकारला विकास नाही तर फक्त नौटंकी करायची आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रोहा वरसे येथे सरकारवर केली.
दरम्यान अजित पवार यांनी सरकारचे अक्षरश: वाभाडेच काढले. शिवाय त्यांनी सरकारमधील नेत्यांना चिमटेही काढले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारची फसवी कर्जमाफी, सरकारचे फसलेले आर्थिक धोरण, पाण्याचे धोरण, वाढते नागरीकरण आणि त्यासाठी राबवलेल्या उपाययोजना असेल किंवा सध्याचं भीमा कोरेगाव प्रकरण, भाजप मंत्र्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य असतील किंवा मिडियाची होणारी गळचेपी, याचा खरपूस समाचार घेतला. शिवाय त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले. तर कधी सेना-भाजप यांच्यातील युतीवरही ताशेर ओढले. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये वाढती लोकसंख्या आणि वाढते नागरीकरण त्यामुळे पाण्याची समस्या कशी निर्माण होते आणि त्यासाठी नियोजन कसे असले पाहिजे हे सांगितलं. स्थानिक पातळीवर नळपाणी योजना राबविताना त्याचे आर्थिक नियोजन करुन पाण्याचा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. सरकारची आज वाईट अवस्था आहे. कापसावर बोंडअळीचे संकट आले . धानावर तुडतुडे झाले परंतु त्या शेतकऱ्यांना अजुन काही मिळालेले नाही किंवा मार्गही काढलेला नाही. आमच्या सरकारच्या काळात सरकारवर २ लाख १० हजार कोटीचे कर्ज होते. परंतु या सरकारने साडेचार लाख कोटीपर्यंत कर्ज करुन ठेवले आहे. त्यामुळे हे सरकार आश्वासनापलीकडे काहीच देवू शकत नाही अशीही टिका अजित पवार यांनी केली.