पटेलांच्या विधानानंतर काँग्रेसने ठोकला मतदारसंघावर दावा

0
8
गोदिंया,दि.१८ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करताच काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नागपूरला पाठवून या मतदारसंघातील नेत्यांशी चर्चा करुन अहवाल देण्यास सांगितले आहे.काँग्रेसच्या नेत्यांनीही पोटनिवडणुकीसह पुढील सर्व निवडणुका लढविण्यास काँग्रेस सज्ज असल्याची माहिती विखे पाटलांना दिल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे या मतदारसंघावर दावा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रिय झाले असून पोटनिवडणुकीत विजय शिवणकर हे संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चितही झाले आहेत.जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्यानंतर या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.शनिवारलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात पत्रपरिषदेत सांगितले होते. यात पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.विशेष म्हणजे पुण्यात अजित पवार यांनी एका पत्रपरिषदेत गोंदिया-भंडाराची जागा काँग्रेसला देत पुणे शहरची जागा राष्ट्रवादी घेऊ शकते असे विचार व्यक्त केल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसारित केले होते.त्यानंतर या राजकीय धुमाळीला जोर चढला आहे.
पटेल यांच्या स्पष्टोक्तीनंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना तात्काळ नागपूरला पाठविले. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची त्यांनी नागपुरात बैठक घेतली. या बैठकीला आमदार गोपालदास अग्रवाल,माजी खासदार नाना पटोले,पर्यवेक्षक डॉŸ.बबनराव तायवाडे, गोदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम गणवीर,माजी मंत्री बंडू सावरबांधे,गोंदिया जि.प.अध्यक्ष सीमा मडावी,विनोद जैन,डॉ.योगेंद्र भगत,राजेश नंदागवळी,डॉ.झामसिंग बघेले,पि.जी.कटरे,गिरीष पालीवाल,सभापती रमेश अंबुले,नामदेवराव किरसान,अशोक लंजे,डेमेंद्र रहागंडाले,भागवत नाकाडे,जिया पटेल यांच्यासह भंडारा व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,जि.प.प.स.पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून पक्षाने ही संधी सोडू नये,पोटनिवडणूकीतही पक्षाने आपला उमेदवार द्यावा अशी भूमिका राधाकृष्ण विखे पाटलांसमोर मांडल्याची माहिती काँग्रेसच्या एका सुत्रांनी दिली.