पुरोगामी-सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण द्या – माणिकराव

0
6

मुंबई – मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुरोगामी व सामाजिक चळवळीतील नेत्यांना संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात ठाकरे यांनी नमूद केले आहे की, गोविंद पानसरे यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. ही घटना महाराष्ट्रात प्रतिगामी व सनातन विचारधारा डोके वर काढत असल्याचे निदर्शक आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी व सामाजिक चळवळीतील तसेच पीडित-शोषितांसाठी आवाज उठविणाऱ्या सर्वच नेत्यांना पुरेसे संरक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने अशा नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना पुरेसे संरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

विचारांची लढाई विचारानेच झाली पाहिेजे, अशी भूमिका घेऊन स्वस्थ बसणे आता संयुक्तिक नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली सर्वत्र झुंडशाही व गुंडगिरी सुरू झाली आहे. संपूर्ण देशात वैचारिक दहशतवाद थैमान घालतो आहे. नथुराम गोडसेच्या दहशतवादी कृत्याचा उदो-उदो करून गांधी विचारांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. अशा सर्व प्रवृत्तींना वेळीच रोखले गेले नाही तर भविष्यात देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे