10,161 ग्रामपंचायतींचा; शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न

0
17

खेमेंद्र कटरे
गोंदिया-राज्यातील पोलिस प्रशासनाचा गावातील नागरिकांशी सौहार्दपुर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्याची आबा पाटलांची संकल्पना आज गावागावातील तंट्याना फाटा देत सुखसमृध्दी व शातंतेचा संदेश देत आहे.स्थानिक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून गावस्तरावर ग्रामस्थांच्या सहकार्याने “महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ राज्यात २००७ पासून राज्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेत दरवर्षी हजारो गावे सहभागी होत आहेत.
या माध्यमातून ग्रामस्थ गावातील भांडणतंटे गावातच मिटवून घेत गावाला “शांततेतून समृद्धीकडे’ नेण्याचा प्रयत्न करत आहेत.काही जिल्ह्यांनी तर शंभऱ टक्के तंटामुक्त होण्याचा बहुमान सुध्दा पटकावला आहे.विशेष म्हणजे नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यानेही यात सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे राज्यात २०१२-१३ या कालावधीत १७,७४५ गावांनी “शांततेतून समृद्धीकडे’ मार्गक्रमण केल्याचे पाहावयास मिळत आहे. उर्वरित १० हजार १६१ ग्रामंपचायतीही दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहिमेत सहभागी होऊन गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, हे विशेष.ही मोहीम अधिक सक्षमपणे राबवून तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेला हातभार म्हणून शासनाने शंभऱ टक्के राज्यातील उवर्रीत गावे तंटामुक्त करण्यासाठी पुढाकार घेऊन नियोजन केल्यास खरी श्रध्दांजली आबांसाठी ठरु शकते.
या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील २७,९०६ ग्रामपंचायतींपैकी वर्ष २००७-०८ मध्ये २ हजार ३२८, २००८-०९ मध्ये २ हजार ८९१, तर २००९-१० मध्ये ४ हजार २४९ व २०१०-११ मध्ये ३ हजार ८२४ आणि २०११-१२ मध्ये २ हजार ७१२ तसेच २०१२-१३ मध्ये १ हजार ७४१ असे २००७-२०१३ या कालावधीत १७ हजार ७४५ गावांना (ग्रामपंचायत)”तंटामुक्त गाव’ म्हणून घोषित होण्याचा बहुमान राज्य शासनाकडून मिळाला आहे. या गावांना स्थायी विकासासाठी शासनाने लोकसंख्येच्या आधारावर आतापर्यंत ४२९ कोटी १९ लाख ७५ हजार रुपयांचे बक्षीसदेखील वाटप केले आहे. तर उर्वरित राज्यातील १० हजार १६१ गावे (ग्रामपंचायती) आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. ही सर्व गावे वर्ष २०१३-१४ व २०१४-१५ च्या मोहिमेत सहभागी झाली आहेत.
राज्य शासनाच्या या लोकाभिमुख व अभिनव उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या गावांचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तत्कालीन गृहरामंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी सुरू केलेली मोहीम आज खऱ्या अर्थाने राज्यातील तळागाळात असलेल्या गावापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.परंतु त्यांच्या या चळवळीला काही असामाजिक त्तत्व पुरोगामी विचारवंताच्या हत्या करुन काळीमा फासण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्यावर शासनाने सुध्दा आळा घालणे आवश्यक आहे.
राज्यात २७ हजार ९०६ ग्रामपंचायती आहेत. या गावात शांतता, अहिंसा प्रस्थापित व्हावी, तसेच गावातील भांडणतंटे गावातच सामोपचाराने मिटवले जावेत, यासाठी प्रत्येक ग्रामंपचायत स्तरावर १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यभरात महात्मा गांधी यांच्या नावाने तत्कालीन गृह राज्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी “महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’ ही लोकाभिमुख व अभिनव योजना सुरू केली. त्यामुळे दरवर्षी गावस्तरावर स्थानिक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तंटामुक्त गाव समितीची स्थापना करण्यात येऊ लागली.
या समित्यांच्या माध्यमातून गावात निर्माण होणारी दिवाणी, महसुली, फौजदारी प्रकरणे व इतर तंटे ग्रामस्थांच्या सहकार्य आणि सामोपचारातून मिटवण्यात येऊ लागले. त्यामुळे ग्रामस्थांचा भांडणतंट्यापायी कोर्टकचेऱ्यांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च, वेळ वाचला आहे. तसेच भाऊबंदकीत किरकोळ कारणामुळे होणारे भांडणतंटे होणेही थांबले. यामुळे गावात शांतता प्रस्थापित होत असल्याने दरवर्षी मोहिमेत हजारो गावांतील ग्रामस्थ स्वत:हून सहभागी होत गाव तंटामुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही तंटामुक्त गाव मोहीम अल्पावधीतच लोककल्याणकारी चळवळ बनल्याचेदेखील पहावयास मिळत आहे.

गावाचा यथोचित गौरव करा
सुरुवातीला मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते तंटामुक्त गावांना पुरस्कार देऊन गौरविले जात हाेते. परंतु मध्यतंरी हा पुरस्कार साेहळा बंद करण्यात आला आहे. आता तरी राज्य शासनाने दरवर्षी तंटामुक्त होणाऱ्या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी या गावाचा एका विशेष कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे