मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप ‘युती’मुळे विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर झाला. राष्ट्रवादीशी कोणतीही कसलीही युती शक्य नाही असे सत्तास्थापनेपूर्वी बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अखेर राष्ट्रवादीचे चुंबन घेतलेच, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील 11 कोटी मराठी जनांना द्रौपदी समजले व त्यांनी त्यांचे भरबाजारात वस्त्रहरण केले आहे असेही म्हटले आहे.भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर केला. राज्यात भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे. मात्र, भाजपने काँग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची जी भूमिका घेतली त्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर दाखविणा-या शिवसेनेने या मुद्यांवरून सरकारचे प्रमुख म्हणून फडणवीसांनाही लक्ष्य केले आहे.