मुंबई, दि. १९ – विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची चांगलीच कोंडी केली असून या पदासाठी शिवसेनेने नीलम गो-हे यांना उमेदवारी दिली आहे. आता मतदानात भाजपा शिवसेनेला साथ देते की राष्ट्रवादीला याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदावरील अविश्वासादरम्यान भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत केली आहे. मात्र, मित्रपक्ष शिवसेनेने निलम गोऱ्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपची आता कोंडी होणार आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य सर्वाधिक आहेत. राष्ट्रवादीने माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. या ठरावावेळी भाजपने राष्ट्रवादीला मदत केल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रवादीला सभापतिपद देऊन उपसभापतिपद मिळविण्याची भाजपची रणनीती आहे. मात्र, शिवसेनेने भाजपच्या या रणनीतीला शह देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीकडून साता-यातील नेते रामराजे निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून पुण्याच्या शरद रणपिसे यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या गोटातील श्रीकांत देशपांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.शिवसेनेनेही ही निवडणूक लढवण्याची स्मार्ट खेळी करत भाजपाची कोंडी केली. आता युती धर्म पाळत भाजपा शिवसेनेला साथ देते की राष्ट्रवादीला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २८ आमदार आहेत. काँग्रेसचे २१ तर भाजपाचे १२ आमदार आहेत. तर शिवसेनेकडे अवघ्या सात आमदारांचे पाठबळ आहेत. त्यामुळे शिवसेनेने फक्त भाजपाची कोंडी करण्यासाठी ही खेळी खेळल्याच चर्चा सुरु झाली आहे.