वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापितांना टक्कर देणार ?

0
22

शेखर भोसले/मुलुंड पूर्व,दि.20ः- ‘बहुजन समाज हा सत्तेचा केंद्र बिंदू बनला पाहिजे, यासाठी बहुजन समाजाने स्वतःचे नेतृत्व स्वतःच केले पाहिजे. गेल्या ७० वर्षापासून बहुजन समाजाने फक्त प्रस्थापितांना बहुसंख्येने मतदान केले व त्यांना सत्तेत बसविले, आता ह्यापुढे असे होवू न देता स्वतःचे नेतृत्व स्वतः करावे’ असे आवाहन करत समस्त बहुजन समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांना सत्तेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या माध्यमातून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन प्रस्थापित आघाड्यांना पर्याय देण्यासाठी तिसरी आघाडी खासदार असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमसोबत केली. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मराठा, ब्राम्हण, बौद्ध, मुस्लिम, आगरी, कोळी, ओबीसी तसेच इतर सर्व समाजातील वंचित घटकाला एकत्र आणायचा कसून प्रयत्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर करत आहेत.

मंडल आयोगाच्या अंमलबजावणी नंतर बिगर ओबीसी समाजाने आणि मुस्लिमेतर समाजाने भाजप या उजव्या विचारधारेच्या पक्षाला जवळ केले त्यामुळे भाजपाचा विस्तार होऊन काँग्रेसला एक मजबूत पर्याय निर्माण झाला. राम मंदिर, हिंदुत्व व अल्पसंख्याक द्वेष या आधारावर भाजपा आधाडी सत्तेवर आली. पुढे राष्ट्रीय राजकारणात आघाड्यांचे युग अस्तित्वात येवून युपीए, एनडीए व तिसरी धर्मनिरपेक्ष डाव्यांची आघाडी असे चित्र निर्माण झाले. कालांतराने मार्क्सवादी व इतर डाव्या आघाडीची पडझड होऊन सध्या केंद्रीय राजकारणात एनडीए व यूपीए या दोनच आघाड्या उरल्या. गेल्या पाच वर्षात देशात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववाद बळकट होत होता. एका बाजूला भारताचा आर्थिक विकास, भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा संवर्धन व डिजिटल भारत अशी प्रतिमा निर्माण होता होती तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साथीने हिंदू राष्ट्र उभारायला व गांधीतत्वांना तिलांजली द्यायला सुरुवात झाली होती.

सध्या महाराष्ट्रात रिपाईचे इतर गट व त्यांचे नेते प्रभावहीन व नावालाच उरलेत. रिपब्लिकन पक्षातील गवई गट आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष हे काँग्रेसशी जवळीक साधून आहे. भाजपकडे आठवले गट आणि सुरेखा कुंभारे यांचा बहुजन रिपब्लिकन एकता मंच आहे. खा. रामदास आठवले यांच्या वैचारिक धरसोडपणामुळे तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या वेळी त्यांनी दाखविलेल्या उदासीनतेमुळे तसेच सत्तेसाठी कोणाशीही जुळवून घेण्याच्या पद्धतीमुळे आंबेडकरी जनतेवरील त्यांचा प्रभाव ओसरलेला आहे. त्यांची जागा आता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या वेळी आंबेडकरी जनतेच्या भक्कम पाठिशी राहून त्यांच्या मनात आदर निर्माण करण्यात व त्यामुळे आपले अनुयायी वाढविण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले. त्यांची वैचारिक बैठक प्रभावी आहे. ते फार राजकीय प्रलोभनाला बळी पडत नाहीत, तसेच रामदास आठवले प्रमाणे भावनेचे आणि फक्त एकाच जातीला पकडून राजकारण करत नाहीत त्यामुळेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व प्रभावीपणे उभे राहताना दिसत आहे. वंचित-बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते दलितेतर जातींना विशेष प्राधान्य देताना दिसतात.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता २०१९ च्या १७ व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील आंबेडकरी दलित, मुस्लिम, डावे, काही मागास जाती यांची मोट बांधून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व आंबेडकरी जनतेला आकर्षित करु लागले. त्याचाच एक भाग म्हणून वंचित-बहुजन आघाडीची निर्मिती केली गेली व त्यायोगे राज्याच्या राजकारणाची कूस दलित-बहुजन पासून वंचित-बहुजन अशी बदलली. दलित-बहुजन या शब्दप्रयोगातून केवळ जाती आधारित राजकारणाची समीकरणे लक्षात येतात आणि त्यामुळे वंचित-बहुजन ही मांडणी अधिक व्यापक व विस्तृत राहू शकते व वंचित-बहुजन आघाडी असे नामकरण केल्याने ही आघाडी जातआधारित कमी व वर्गाधारित जास्त असे चित्र निर्माण होते. वंचित याचा अर्थ सर्व बहुजन, दलित, अल्पसंख्याक व शेतकरी, महिला, कामगार, विस्थापित, स्थलांतरित, प्रकल्पबाधित, कष्टकरी, भटके इत्यादी असा होता आणि बहुजन म्हणजे सवर्णोतर सर्व मागास जाती. म्हणूनच जात आणि वर्ग हा आधार ध्यानी ठेवून वंचित-बहुजन आघाडीची स्थापना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केली. भावनिक राजकारणापासून दूर होऊन जागतिकीकरणाचे खरे वास्तविक भान या वंचित समूहांना आणून देण्यासाठी व लोकशाहीचे समाजीकरण करून छोट्या-छोट्या जातींना आतापर्यंत सत्तेत पोहचता येत नव्हते त्या सर्वांना न्याय्य संधी देण्याच्या हेतूने या वंचित-बहुजन आघाडीची निर्मिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी केल्याचे सांगितले जाते.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी २०१४ नंतर कायमच भाजपविरोधात स्पष्ट भूमिका घेतली व त्याच अनुषंगाने दलित व वंचित बहुजन समाजासोबत मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी खा. असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएम या राजकीय पक्षाशी युती केली. भाजप व काँग्रेसपासून समान अंतर राखून असलेल्या भारिप बहुजन महासंघानं असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमशी युती करून ‘वंचित बहुजन आघाडी’ निर्माण केली. एमआयएम ही कट्टरपंथी मुस्लिम संघटना आहे. या दोन्ही संघटनेचे राजकारण एकमेकाला पूरकच राहिलेले आहे. एमआयएमचे सध्या तीन आमदार तर काही महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांत त्यांचे कार्यकर्ते निवडून आलेले आहेत. राज्याच्या राजकारणातील स्वत:चे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती करून अनपेक्षित खेळी खेळली.

येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून विखुरलेल्या दलित-वंचित बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या व बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी त्यांचे अनुयायी तसेच दलित-वंचित बहुजन समाज बहुसंख्येने या सभेला उपस्थित राहिला. प्रकाश आंबेडकरांचे वाढलेले दलित अनुयायी आणि वंचित-बहुजन आघाडीच्या सभेला होणारी प्रचंड गर्दी पाहून ही आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात विदर्भ आणि इतर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडी व भाजपा युतीला जोराची टक्कर देवू शकते असे चित्र निर्माण झाले. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाचे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व आहे. नागपूरसह विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये सुद्धा आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एमआयएमने विदर्भात अद्याप पाय रोवलेले नाहीत. मात्र, ओवैसी यांची आक्रमक शैली आणि ‘मुस्लिमांचा पक्ष’ ही ओळख विदर्भातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यास पुरेशी ठरू शकते. त्यामुळेच वंचित-बहुजन आघाडीच्या माध्यमातून भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन ओवैसी यांचा विदर्भातील प्रवेश काँग्रेसप्रणित महाआघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो.

वंचित-बहुजन आघाडीमुळे काँग्रेस पक्षाच्या परंपरागत मतपेटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि विदर्भातील बहुतांश मतदारसंघांत अनुसूचित जाती आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. वंचित-बहुजन आघाडीचे समीकरण यशस्वी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट झळ पोहोचेल आणि थोडाफार प्रमाणात भाजपा शिवसेना युतीला देखील त्याचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.

ओवेसींच्या पक्षाशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध करण्याची भूमिका मांडली आहे. त्यावरून वादंग माजले. शिवसेनेनं या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांवर तोफ डागलीच आहे. वंदे मातरम्’ला विरोध दर्शवणारे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. ‘एमआयएमच्या भूमिकेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवानं आंधळ्यासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे. त्यांची ही भूमिका संविधानद्रोही व बाबासाहेबांच्याच विरोधात आहे. मातृभूमीला मानणारे लाखो मुसलमान जेव्हा ओवेसींचं राजकारण ठोकरून लावतील, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार?,’ असा सवाल करतानाच, ‘या देशात वंदे मातरम् म्हणावंच लागेल,’ असा सज्जड इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे.

अनुसूचित जाती आणि मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही स्थितीत भाजपला होण्याची शक्यता नाही. हे दोन्ही समाज परंपरागतपणे काँग्रेसला मतदान करीत आहेत. त्यामुळे वंचित-बहुजन आघाडीद्वारे होणारे नुकसान कसे कमी करता येईल, यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते विचार करत आहेत व भाजपा सेना युतीला रोखायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यातच त्यांचा फायदा आहे हे कॉंग्रेस जाणून होते त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन तशी चर्चाही केली. आंबेडकर यांचा पक्ष आघाडीत आल्यास चार जागा देण्याची तयारीही या पक्षांनी दर्शविली. मात्र, आंबेडकर यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्यांनी १२ जागांची मागणी केली. परंतु आंबेडकर यांच्या अपेक्षा कितीतरी पट अधिक असल्याने एवढ्या जागा देण्यास काँग्रेस आघाडीने नकार दर्शविला त्यामुळे प्राथमिक चर्चेपूर्वीच पेच तयार झाला. राज्य विधानसभेत दोन आमदार निवडून आणणाऱ्या एमआयएमलाही काँग्रेसने विशेष महत्त्व दिले नाही. त्यामुळे ओवैसी हे सुद्धा काँग्रेसपासून दूर आहेत. आता लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस आघाडीत सामील न झाल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजप सेना युतीला होणार आहे व आघाडी झाली असती तर भविष्यात भाजपा सेना युतीला त्यांना अपेक्षित असणाऱ्या जागा मिळवण्यात खूपच मोठी कसरत करावी लागेली असती.

नुकत्याच मुंबईत शिवाजी पार्क येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी आंबेडकर व ओवैसीचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते. ह्या सभेला आनंदराज आंबेडकर, कोळसे पाटील व इतरही अनेकांनी संबोधित केले. सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता वंचित बहुजन आघाडीचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार व ह्या शक्तीप्रदर्शनामुळे वंचित बहुजन आघाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लोकसभेची कॉंग्रेस आघाडीची गणिते बिघडवू शकतात व ही एकत्र आघाडी न झाल्यामुळे भाजपा शिवसेना युतीचाच अधिक फायदा होवू शकतो हे मान्य केलेच पाहिजे.