मुंबई,दि.20(वृत्तसंस्था)ः- भाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरत आहे, म्हणूनच प्रियंका गांधी सोनभद्र या ठिकाणी हिंसाचार पीडितांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादर पश्चिम येथे इंडियाबुल्ससमोर निदर्शने केली.
काँग्रेसकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आ. यशोमती ठाकूर, मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, गजानन देसाई, सचिव शाह आलम शेख, तौफिक मुलाणी, दादासाहेब मुंडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.





