राजापेठ रेल्वे पूल, वॅगन दुरुस्ती कारखान्याचा मुद्दा खा.राणांनी संसदेत गाजविला

0
19

अमरावती,दि.20 : स्थानिक राजापेठ रेल्वे उड्डाणपूल, अंडरपास आणि बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी संसदेत केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लक्ष वेधताना संथगतीने सुरू असलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे विभागाला द्यावेत, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
खासदार राणा यांनी अमरावतीकर जनतेच्या जिव्हाळ्याचा राजापेठ रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचा मुद्दा उपस्थित केला. चार वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असताना ते अपूर्ण आहे. दीड वर्षांपासून या पुलाची कामे संथगतीने सुरु आहेत. अ‍ॅम्ब्यूलन्स रेल्वे क्रॉसिंग करून जाऊ शकत नाही. त्यामुळे १० किमी अंतर ओलांडून रुग्णांची ने-आण करावी लागते, ही बाब त्यांनी लोकसभेत मांडली. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या महत्प्रयासाने बडनेरा येथे निर्माणाधीन वॅगन दुरुस्ती कारखाना कधी पूर्ण होणार, असा सवाल त्यांनी लोकसभा अध्यक्षाकडे केला.गेल्या सात वर्षांपासून निधी आहे तरीही वॅनग दुरूस्ती कारखाना निर्मितीला उशीर का होतेय या बाबीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
त्यावर राजापेठ रेल्वे उड्डाणपूल आणि बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कारखान्याचे संथगतीने सुरू असलेली कामांना तात्काळ गती द्यावी, असे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले. खासदार राणा यांनी जनतेचे प्रश्न, समस्या, वेदना समजून घेताना त्या लोकसभेत सोडविण्यास पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असे चित्र आहे.