साकोली,दि.26ःविद्यमान भाजप सरकार श्रेय लाटून कामगार साहित्य पेटी वाटप करीत आहेत. मात्र, या पेटीवाटपातून भाजपाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ही खरी योजना काँग्रेसच्या काळातील होती. त्याची अंमलबजावणी आज भाजप सरकार करीत आहे. मात्र, ज्यांच्यासाठी ही योजना होती त्या खर्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभच मिळत नाही, असा आरोप माजी खासदार तथा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मंगलमुर्ती सभागृह येथे आयोजित पत्रपरिषदेत केला आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आ. सेवक वाघाये, मधुकर लिचडे, कारेमोरे, धनराज साठवणे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकर्यांना भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. फक्त आठ तास विद्युत पुरवठा होत आहे. खताचे भाव दीडपटीने वाढले आहे. तसेच पेट्रोल, डिझेलचे दरही वाढले आहेत. हे सरकारच भाजपविरोधी आहे. सध्या कामगार साहित्य पेटी वाटप कार्यक्रम जोमाने सुरू आहे. प्रामुख्याने ही योजना काँग्रेसची असून मनमोहन सिंग सरकारच्या काळातील आहे. यात लाभार्थ्याला एक लाख रुपयापर्यंत मदतीचे प्रावधान असून यात आरोग्य, शिक्षण व इतर साहित्य खरेदीसाठी पैसे जातात. मात्र, भाजप सरकारने कामगार साहित्यपेटी अवघ्या पंधराशे रुपयाची खरेदी करून २0 हजार रुपये तिची किंमत दाखवून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे व गोरगरिबांचा पैसा त्यांच्याच उन्नतीसाठी वापरता आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एसटीची भाववाढ करून प्रति तिकीट १ रुपये विम्यापोटी अधिकचे घेऊन हा पैसा मातोश्रीवर शिवसेनेला पाठविण्यात येतो. जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आली तेव्हापासून नोकरभरती बंद आहे. देशाची आर्थिक स्थिती खालावली असून आतापर्यंत हजारो कारखाने बंद पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली जनादेश यात्रा शासकीय खर्चातून काढली आहे. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. या सर्वांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसतर्फे अमरावती येथून भाजपची पोलखोल यात्रा काढत आहोत. महाराष्ट्रात येणारी सरकार ही काँग्रेस, राष्ट्रवादीचीच असेल, असेही नाना पटोले म्हणाले.





