सेनेने शिकवू नये, हार-जीत होतच असते- राणें

0
22

मुंबई- शिवसेनेने ही पोटनिवडणुक विकासाच्या नव्हे तर भावनेच्या मुद्यावर लढली. मी मात्र विकासाबाबत बोलत होतो. मला 35 हजारांच्या घरात मते मिळाली, मला मतदान करणा-याचे आभार मानतो. निवडणुकीत जय-पराभव हा लोकशाहीचा भाग आहे. मी आजवर 9 निवडणुका लढवल्या आहेत. आता आपण भविष्याचा विचार करू अशा शब्दात नारायण राणेंनी पराभवानंतर भावना व्यक्त केल्या. मला मदत करणा-या सर्व काँग्रेस नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, सपाचे अबू आझमी व शेकापचे जयंत पाटील यांचे मी ऋण व्यक्त करतो असेही राणेंनी सांगितले.
वांद्रेत शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्याकडून 19 हजार मतांनी पराभव झाल्यानंतर नारायण राणेंनी दोनच्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला.राणे म्हणाले, या पराभवाने मी खचून जाणा-यातला नाही. लोकशाहीत हार-जीत होतच असते. यात माझा पराभव झाला. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसला 12 हजार मते पडली होती त्यात आता 33 हजारांपर्यंत वाढ झाली आहे. सर्व काँग्रेस नेत्यांनी एकजूट दाखवली, चांगले काम केले. मी सर्वांचे आभार मानतो.
ते पुढे म्हणाले, माझ्या पराभवाला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. पुढे काय करायचे ते शिवसेनेने मला शिकवू नये. शिवसेना नेत्यांनी तर मला अजिबात निष्ठा शिकवू नये. उमेदवारांकडून पैसे घेऊन राजकारण करणा-या शिवसेनेने विकासाला नव्हे तर भावनेच्या मुद्यांला हात घातला. जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नयेत. माझ्या घराबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडले नाहीत माध्यमे मला डिवचत आहेत ते योग्य नाही असे सांगत वृत्तवाहिन्यांबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांनी मनापासून काम केले असा दावाही राणेंनी यावेळी केला.