गोंदिया/साकोली(खेमेंद्र कटरे),दि.17 :– पुर्व विदर्भातील सर्वाधिक चर्चेची असलेली साकोली विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.या निवडणुकीत या मतदारसंघाचे लाडके भुमिपूत्र असलेल्या नानाभाऊंच्या पराभवासाठी भारतीय जनता पक्षाने रचलेला चक्रव्युव कशाप्रकार नानाभाऊ तोडतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.या मतदारसंघात तिहेरी लढत तयार करुन पटोलेंना घेरण्याचे काम भाजपने केले.त्यातच ज्या मच्छिमार समाजासाठी त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीत्वाच्या काळात संघर्ष केला,त्यामुळे त्या समाजात असलेला विश्वास तोडण्यासाठी भाजपच्या रणनितीने बहुजन समाज पक्षाकडून डाॅ.प्रकाश मालगावे हे रिंगणात उतरल्याची मतदारामध्ये चर्चा आहे.तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत माजी आमदार सेवक वाघाये रिंगणात उतरल्याने हे दोन्ही उमेदवार पटोलेंना घेरण्यासाठीच भाजपने उतरविल्याची चर्चा मतदारसंघात फेरफटका मारल्यास एैकावयास मिळते.साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रचाराने जोम धरला आहे. साकोली विधानसभा मतदार संघात एकूण १५ उमेदवार रिंगणात असून खरी लढत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपचे डॉ. परिणय फुके यांच्यातच असली तरी वंचित आघाडीचे सेवक वाघाये हे तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.भाजपही वाघाये जेवढे अधिक मेहनत घेतील तेवढा आपला लाभ या पध्दतीने राजकीय समीकरण बसवून काम करीत असल्याचे दिसून येत आहे.वाघाये किती मते घेतात यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून एकंदरीत जनमाणसांचा कौल लक्षात घेता गावखेड्यातील मतदारात नानाभाऊंचा प्रभाव कमी झालेला दिसून येत नाही.काँग्रेस उमेदवार नानाभाऊने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. विदर्भातील ‘हेविवेट‘ लढतीत साकोली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले व भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्यातील लढतीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहीलेले आहे.भाजपचे परिणय फुके यांनी तर आपल्या प्रचाराला हायटेक स्वरुप देण्यासाठी नागपूरातील भली मोठी फौजच उतरवून ठेवली आहे.त्या तुलनेत पटोलेंचा प्रचार हा सामान्य स्तरावरच असल्याचे दिसून येत आहे.
जनशक्ती विरुद्ध धनश्नती अशी लढत असल्याचीही चर्चा जनमाणसांत रंगत असली तरी वंचितचे सेवक वाघाये यांच्या उमेदवारीने नाना पटोले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जाते. कारण सेवक वाघाये यांनी जर निवडणूक लढविली नसती तर मतदान संघातील सेवक वाघाये यांचा काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने नाना पटोले यांच्या विरोधात डॉ. परिणय फुके यांना मदत केली असती हे उघड आहे. आमदार बाळा काशिवार यांना पुन्हा तिकीट न देऊन कोहळी समाजाची व ब्रम्हानंद करंजेकर यांनी भाजपसाठी तेली समाजाला गृहीत धरुन केलेली खेळी ही भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यातच नानाभाऊ हे नागपूरात राहू लागले असले तरी त्यांनी आपल्या सुकळीतील जन्मस्थळाला कधीच सोडले नसल्याने ते आमच्यासाठी स्थानिकच असल्याचा दावा मतदारांनी करुन भाजप उमेदवाराच्या आपणही याच जिल्ह्यातील मतदार असल्याने बाहेरचा कसा यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.फुके हे नागपूर निवासीच असल्याचा संदेश जनमाणसात रुजविण्यात काँग्रेस कार्यकर्ते यशस्वी होत आहेत.असे असले तरी भाजप कार्यकर्त्यांची मजबूत फळी, मोदींची पार पडलेली सभा व डॉ. परिणय फुके यांना मुख्यमंत्री व गडकरी यांंचा असलेला पाठिंब्यामुळे फुके यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या नानाभाऊंना कर्मभूमीतच तगडे आव्हान दिले आहे,हे सुध्दा तेवढेच सत्य आहे. या मतदार संघात अनुसूचित जातीची मते मोठ्या प्रमाणात असल्याने ते बहुजन समाज पक्ष, वंचित आघाडी व काही प्रमाणात काँग्रेसमध्ये विभागली जाणार. अशा स्थितीत ज्या अनुसूचित जातीच्या गठ्ठा मतांच्या बळावर व कुणबी समाजाच्या काही प्रमाणात मिळणाèया मतांच्या बळावर सेवक वाघाये आव्हान उभे करतील. हा राजकीय जाणकारांचा अंदाज होता तो विरोधकांवराच उलटतांना दिसून येत आहे. मतदारसंघात कुणबी समाजावर असलेली नाना पटोलेंची पकड, गावागावात असलेला गोंड- गोवारी व ढिवर समाजाचा पटोले यांना मिळणारा पाठिंबा,ओबीसी,शेतकरी मुद्यावर त्यांनी केलेले काम,त्यासाठी तुरुगांत जायलाही ते घाबरले नाहीत.त्यामुळे जणमाणसांनी त्यांची मतदारसंघात असलेली नाळ पटोलेंना मिळणारी बहुजनांची सहानुभूती त्यांच्यासाठी लाभदायक ठरणारी जेवढी आहे.तेवढ्याच प्रमाणात डॉ. परिणय फुके यांना विजयी करण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी कसलेली कंबर यामुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सामदाम दंड-भेद या नितीने विजयासाठी मेहनत घेत आहे.
परंतु मतदारसंघातील आढावा घेतल्यास वंचित कडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात असलेले सेवक वाघाये हे काँग्रेसचे विजयाचे गणित बिघडवणार असे बोलले जात असतांनाच सेवक वाघाये यांना दिलेले मत म्हणजे अप्रत्यक्ष भाजपला मदत करुन विजयी करणे होय असा सुर सुध्दा ओबीसी,बहुजन,आदिवासी अनुसूचित जातीच्या बहुसंख्य मतदारामध्ये दिसून येत आहे.त्यामुळे या मतदार संघात तिहेरी लढतीचे चित्र रंगविण्यात येत असले तरी खरी लढत ही काँग्रेस व भाजपा उमेदवारांमध्येच असल्याचे दिसून येत आहे.





