औरंगाबादमध्ये शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौरपदी

0
7

औरंगाबाद- महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप शिवसेना युतीने सत्ता स्थापन केली आहे. बुधवारी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी एमआयएमच्या गंगाधर ढगे यांचा 71 विरुद्ध 26 अशा फरकाने पराभव केला. तर काँग्रेसच्या उमेदवाराला 16 मते मिळाली.

महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या ताणाताणीनंतर अखेर युतीचा फॉर्म्युला ठरला होता. त्यामुळे महापौर युतीचाच होणार हे निश्चित झाले होते. शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेल्या करारानुसार त्र्यंबक तुपे हे दीड वर्षासाठी महापौरपदी असतील. तर त्यानंतर एका वर्षासाठी भाजपकडे महापौरपद असणार आहे.
युतीचे म्हणजे भाजप आणि शिवसेना यांचे 51 नगरसेवक होते, त्यात 15 अपक्षांनीही युतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे 66 मते निश्चित असल्याने केवळ नावापुरती ही निवडणूक होणार हे निश्चित होते. पण प्रत्यक्ष बुधवारी निवडणूक झाली त्यावेळी युतीच्या त्र्यंबक तुपे यांना 71 मते मिळाली. म्हणजे आणखी 5 उमेदवारांनी त्यांना मतदान केले.