नितीशच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, लालुंच्या उपस्थितीत मुलायम यांची घोषणा

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. ८ – बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितिश कुमार हे सपा, राजद आणि जेडीयू यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी दिल्लीत राजदचे प्रमुख लालप्रसाद यादव आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. धार्मिक शक्तींना रोखण्यासाठी जेडीयूबरोबर आल्याचे लालूप्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यापूर्वी रविवारी लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर सोमवारी काँग्रेस आणि जेडीयू यांच्यातही आघाडी झाल्याची बातमी येत आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी आधीच नितीशकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, मंगळवारी नितीश कुमार मोठ्या प्रमाणावर प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे समजते आहे. नितीश कुमार यांनी प्रचारासाठी ज्या टीमवर जबाबदारी दिली आहे, ती टीम मंगळवारी पहिले मोठे कँपेन ‘जन भागीदारी अभियान’ नावाने सुरू करणार आहे. याच टीमने मोदींसाठी प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती.
मुलायमसिंह यादव म्हणाले, “लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या एकत्र येण्याने मला आनंद झाला आहे. लालूप्रसाद यांनीच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता; तसेच ते प्रचारही करणार आहेत. आता कोणतेही मतभेद नाहीत. जातीयवादी शक्तींना आम्ही एकत्रित येऊन पराभूत करू.‘‘ अनेक दिवसांच्या वादानंतर कालच (ता. 7) संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांनी निवडणुकीसाठी आघाडी करण्यास मान्यता दिली होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करत त्यांनी रणशिंग फुंकले आहे. या पत्रकार परिषदेला लालूप्रसाद यादव आणि शरद यादव हे नेतेही उपस्थित होते. लालूप्रसाद यांनीही नितीशकुमार यांनाच प्रथमपासून पाठिंबा असल्याचे आणि वाद असल्याबाबतचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले.