भारत ५ धावांनी पराभूत

0
6

वृत्तसंस्था
कानपूर, दि. ११ – सलामीवीर रोहित शर्माच्या झंझावाती १५० धावा आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीनंतरही पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ५ धावांनी पराभव झाला. आफ्रिकेचे ३०४ धावांचे लक्ष गाठताना भारताला ५० षटकांत ७ गडी गमावत २९८ धावाच करत आल्या.

कानपूर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामना पार पडला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेचा कर्णधार ए बी डिव्हिलियर्सने दमदार शतक ठोकून आफ्रिकेला ३०३ धावांचा पल्ला गाठून दिला. फाफ डू प्लेसिसची ६२ तर फराहन बेहरादिनच्या नाबाद ३५ धावांच्या खेळीने आफ्रिकेला त्रिशतक ओलांडता आले. अमित मिश्रा आणि आर अश्विन या फिरकी जोडीने आफ्रिकेच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले होते. मात्र शेवटच्या षटकांमध्ये भारताच्या वेगवान गोलदाजांना आफ्रिकेला रोखता आला नाही. भारतातर्फे उमेश यादव व अमित मिश्राने प्रत्येकी दोन तर आर अश्विनने एक विकेट घेतली. आफ्रिकेने ५० षटकांत ५ गडी गमावत ३०३ धावा केल्या.

आफ्रिकेचे ३०४ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. सलामीवीर शिखर धवन २३ धावांवर बाद झाला. यानंतर रोहित व अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने १४९ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. अजिंक्य रहाणे ६० धावांवर बाद झाला त्यावेळ भारताची स्थिती ३३.४ षटकांत २ बाद १९१ अशी होती. त्यानंतर विराट कोहली ११ धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा १५० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ सुरेश रैना ३ धावांवर बाद झाल्याने भारताची स्थिती ५ बाद २७३ अशी झाली. शेवटच्या षटकांत भारताला विजयासाठी ११ धावांची गरज होती. मात्र धोनी ३१ तर स्टुअर्ट बिन्नी २ धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकात आफ्रिकेचा नवखा गोलंदाज कागिसो रबादाने अचूक मारा करत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. भारताला ५० षटकात ७ गडी गमावत २९८ धावांवर रोखण्यात आफ्रिकेला यश आले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने १- ० ने आघाडी घेतली आहे.