BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा

0
4

वृत्तसंस्था
मुंबई, दि. १९ – शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका अधिक तीव्र झाली असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना विरोध दर्शवत शेकडो शिवसैनिकांनी आज सकाळी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून निदर्शने केली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ , ‘शहरयार चले जाव’ असे फलक आणि काळे झेंडे फडकावत बीसीसीआयच्या कार्यालयात घुसलेल्या शिवसैनिकांनी भारत- पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान सेनेच्या या राड्यानंतर बीसीसीआय-पीसीबीची चर्चा रद्द झाली आहे.
पाकिस्तानमुळे आपले जवान शहीद होत असताना, त्यांच्या हल्ल्यामुळे देशातील निरपराधांचे प्राण जात असताना पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवता येणार नाही असे सांगत शिवसैनिकांनी शहरयार खान यांना विरोध केला आहे.
भारत व पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामन्यात येणा-या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय चीफ शशांक मनोहर व पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या दरम्यान आज बैठक होणार होती, त्यासाठी शहरयार खान मुंबईतही आले होते.