आदर्श, मॉडेल क्रीडा संकुलासाठी सर्वतोपरी प्रयत्न- राजकुमार बडोले

0
10

गोंदिया दि. ७ : गोंदियासारख्या मागास व दुर्गम भागातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी सर्व सोयी सुविधांनीयुक्त असलेले क्रीडा संकूल तयार होत आहे. हे क्रीडा संकूल राज्यात आदर्श व मॉडेल म्हणून नावारुपास येण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन इमारतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे स्थानांतरण करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. बडोले बोलत होते. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, प्रा. जिवानी, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी आदी उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले, क्रीडा संकुलाच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. क्रीडा संकुलाच्या पूर्णत्वासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतूनही निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

आमदार अग्रवाल यांचे कौतूक करताना ते म्हणाले, मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व विकासासाठी ते तळमळीने काम करतात. येत्या सहा महिन्यात या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. भविष्यात विविध प्रकारच्या क्रीडापटूसाठी हे क्रीडा संकूल उपयोगात येणार आहे.

आमदार श्री.अग्रवाल म्हणाले, राज्यातील एक उत्तम दर्जाचे हे क्रीडा संकूल तयार करण्याचा आपला निर्धार आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीबाबतच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. यासाठी आणखी साडेसहा कोटींची आवश्यकता आहे. या कामाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. पालकमंत्री व आपल्या संयुक्त प्रयत्नाने हे क्रीडा संकूल पूर्ण होईल. क्रीडा संकुलासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक श्री. गिरी यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी श्री. निमगडे यांनी मानले. पालकमंत्री श्री. बडोले यांनी क्रीडा संकुलाच्या इमारतीची तसेच जलतरण तलावाची पाहणी करुन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.