मुंबईने रणजी चषकावर नाव कोरले

0
9

पुणे- अंतिम फेरीत सौराष्ट्रवर एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवत मुंबईने रणजी करंडकावर नाव कोरले. मुंबईचे हे विक्रमी ४१वे जेतेपद आहे. केवळ तीन दिवसांत ‘फायनल’ संपला. १३६ धावांनी पिछाडीवर पडलेल्या सौराष्ट्रचा दुसरा डाव ४८.२ षटकांत ११५ धावांत आटोपला.

मध्यमगती शार्दूल ठाकूरने २६ धावांत निम्मा संघ गारद करताना मुंबईच्या मोठया विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला धवल कुलकर्णी आणि बलविंदर सिंग संधूची (प्रत्येकी दोन विकेट) चांगली साथ लाभली. सौराष्ट्रतर्फे सर्वाधिक २७ धावांचे योगदान कसोटीपटू चेतेश्वर पुजाराचे (२७ धावा) आहे.

तत्पूर्वी, सिद्धेश लाडच्या बहारदार ८८ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३७० धावांची मजल मारली. लाडने अकराव्या क्रमांकावरील बलविंदर सिंग संधूसह (३४) शेवटच्या विकेटसाठी शतकी (१०३) भागीदारी करताना मुंबईला पावणेचारशेच्या घरात नेले. या भागीदारीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात घेतलेली आघाडी निर्णायक ठरली.