प्रतिभावान खेळाडूंना संधीची गरज : पुराम

0
14

भजेपार येथे प्रौढ पुरूष, महिला कबड्डी स्पर्धेचे थाटात उद््घाटन
सालेकसा,दि.01 : ग्रामीण भागात अनेक खेळांचे प्रतिभावान खेळाडू लपलेले आहेत. संधी अभावी त्यांची प्रतिभा आणि कौशल्य समाजासमोर येत नाही. अशा प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज आहे. गावा-गावात क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील संवेदना बहुउद्देशीय संस्था आणि नवयुवक कबड्डी क्लबच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ३१ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ दरम्यान तीन दिवसीय प्रौढ महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान ज्या घरी शौचालय असेल त्या घरातच आपली मुलगी द्या, असे आवाहन आमदार पुराम यांनी उपस्थितांना केले. सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार पुराम यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद््घाटन पार पडले. यावेळी मंचावर प्रभारी सरपंच तुकाराम फुंडे, प्रभाकर दोनोडे, डॉ.संजय देशमुख, दशरथ चुटे, सेवकराम बहेकार, खुशालराव शिवणकर, जि.प.सभापती देवराज वडगाये आदिंसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकातून चंद्रकुमार बहेकार यांनी क्रीडांगणासह गावातील समस्या आणि क्रीडा स्पर्धा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार पुराम यांनी क्रीडांगणासाठी ३ लाखाचा निधी देणार असल्याची घोषणा केल्याने नवयुवक कबड्डी क्लबने त्यांचे आभार मानले. संचालन हेमंत चुटे तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकुमार पाथोडे यांनी केले. भजेपार आणि सालेकसा महिला कबड्डी संघात लढत करून स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील महिला आणि पुरूष कबड्डी संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुवक कबड्डी क्लब आणि भजेपार ग्रामवासी परिश्रम घेत आहेत.