युवकांनो संघटीत व्हा : बहेकार

0
9

गोंदिया दि. 11 -: सांघीक खेळात जेव्हापर्यंत खेळाडूंमध्ये एकसंघ भावना येत नाही तेव्हापर्यंत त्यांच्यात समन्वय शक्य नाही. समन्वय असल्याशिवाय पुढच्या संघावर मात करता येत नाही, सामाजिक विकासात सुद्धा संघटीत युवकांची गरज आहे. त्यामुळे युवकांनो समाज कार्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन चंद्रकुमार बहेकार यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील गर्रा/खुर्द येथे न्यू इलेवन क्रिकेट क्लबच्या वतीने मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी उद््घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात प्रतिभावान खेळाडू आहेत. मात्र, संधीअभावी त्यांचा विकास खुंटला आहे अशा प्रतिभावंतांना क्रीडा स्पर्धेतून संधी मिळते. त्यामुळे गावा-गावात क्रीडा स्पर्धा आयोजित करायला पाहिजे. महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या फलकाचे अनावरण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. क्रिकेट स्पर्धेचे उद््घाटन झाल्यानंतर नि:शुल्क रोगनिदान शिबिराचे उद््घाटन झाले. स्थानिक डॉ.योगेंद्र भगत यांनी रूग्णांची मोफत तपासणी करून औषध वितरण केले. यावेळी मंचावर जीवन शरणागत, जियालाल बोपचे, गोरेलाल बोपचे, जयेंद्र दरवडे, कुर्वेश्वर राऊत, अतुल नंदेश्वर, योगेश शहारे, विनोद शहारे, भुमेश्वर दरवडे, डॉ.योगेंद्र भगत, वेणुबाई गावड, सचिन राऊत, दिनेश दरवडे, आनंद पटले, धनेंद्र बिसेन, संगम शहारे, आदेश नंदेश्वर, रवि जावरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आयोजक मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले.