राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी मारली बाजी

0
12

गोंदिया दि. १८: राष्ट्रीय अंध संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ व विविध क्रीडा स्पर्धांत येथील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत बाजी मारली. विशेष म्हणजे येथील भुमिता माहुर्ले या विद्यार्थिनीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.

सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित उपक्रमांतर्गत विशेष शिक्षकांनी या स्पर्धेसाठी १२ दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांची निवड केली होती. यात, ११ व्या वर्गातील तिरोडा येथील तौफीक महमूद सय्यद याने ११० मीटर धावने व गोळाफेक स्पर्धेत राज्यातून दुसरा, वर्ग ९ वीचा तालुक्यातील पांढराबोडी येथील होमेंद्र नागपुरे याने ५० मीटर धावन्यात दुसरा, वर्ग ९ वीची सडक-अर्जुनी तालुक्यातील भुमिता माहुर्ले हिने १०० व ८० मीटर धावने मध्ये तिसरा व चमचागोटीमध्ये राज्यातून पहिला, वर्ग ८ वीची अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मनिषा बाजीराव झोडे हिने १०० मीटर धावने मध्ये दुसरा, वर्ग १० वीचा सालेकसा तालुक्यातील रोहीत मोतीलाल दमाहे याने बुद्धीबळ स्पर्धेत राज्यातून दुसरा तर वर्ग १० वीचा प्रशांत उपराडे याने ५० मीटर धावने मध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली.

स्पर्धेत या विद्यार्थ्यांसोबत अर्जुनी-मोरगावचे तालुका समन्वयक योगेश कापगते, विशेष शिक्षक विकास नेरकर, तिरोडाच्या विशेष शिक्षिका लिना चव्हाण व देवरीचे प्रमोद सिंगनजुडे होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र एक्स्प्रेसने परत आलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी रेल्वे स्थानकावर सपत्नीक स्वागत केले.विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंंडवार यांनी कौतूक केले. तर स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक विजय ठोकणे, विलास मलवार, तालुका समन्वयक प्रदीप वालदे, गजानन धावडे, थानसिंह बघेले, भुषण सोनकांबळे, राजेश मते, खुशाल भोंगाडे, रविंद्र गुरनुले, रविंद्र सोनवाने, रमेश पटले, जगदीश राणे, संजय गलपल्लीवार आदिंनी सहकार्य केले.