ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने उभारली ‘विजयाची गुढी’

0
11

धरमशाला, दि. 28 – गोलंदाजांनी विजयाचा पाया रचल्यानंतर भारतीय फलंदाजांनी कोणतीही चूक न करता आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘विजयाची गुढी’ उभारली. ऑस्ट्रेलियाचे 106 धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात सहज पार करत सामन्यासह बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने जिंकली. अजिंक्य रहाणे नाबाद (38) आणि लोकेश राहुल नाबाद (51) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.लोकेश राहुलने पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही नाबाद अर्धशतकी खेळी केली. पूजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आत्मविश्वासाने आक्रमक फलंदाजी केली. त्याच्या 38 धावांच्या नाबाद खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. कालच्या बिनबाद 19 वरुन मुरली विजय आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी डावपुढे सुरु केल्यानंतर भारताला 46 धावांवर पहिला धक्का बसला.

मुरली विजय (8) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने वाडेकडे झेल दिला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पूजाराला भोपळाही फोडू न देता मॅक्सवेलने धावबाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रहाणेने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले.

ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत १३७ धावांत खुर्दा उडवत विजयाचा पाया रचला. जाडेजाने ६३ धावांत ४, आश्विनने २९ धावांत ३ आणि उमेश यादवने २९ धावांत ३ गडी बाद करून दुसऱ्या डावांत ५३.५ षटकांत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ग्लेन मॅक्सवेल (४५) आणि पीटर हँड्सकोंब (१८), मॅथ्यू वेड (२५) यांच्या संयमी खेळीनंतरही पाहुण्यांना फार काळ तग धरणे कठीण झाले होते. चहापानापर्यंत ९२ धावांत ५ गडी गमावणाऱ्या पाहुण्या संघाचे उर्वरित ५ फलंदाज तिसऱ्या सत्रात पाठोपाठ बाद झाले.

सामनावीर – रविंद्र जाडेजा
मालिकावीर – रविंद्र जाडेजा